दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला करमाळा बार असोसिएशनचा पाठिंबा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 24, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला करमाळा बार असोसिएशनचा पाठिंबा

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला करमाळा बार असोसिएशनचा पाठिंबा



करमाळा (कटूसत्य वृत्त):- दिल्ली येथे NEET परीक्षेतील गैरव्यवहार तसेच विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला करमाळा तालुका बार असोसिएशनने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात राष्ट्रपतींना निवेदन पाठवून आंदोलनकर्त्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. योगेश अ. शिंगी, उपाध्यक्ष अॅड. राहुल सु. सावंत आणि सचिव अॅड. सागर भि. तळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात दिल्लीतील आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आल्याचा तसेच आंदोलनकर्त्यांवर शासन व पोलिस यंत्रणेकडून लाठीमार व अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवाईचा करमाळा तालुका बार असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
निवेदनात केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, आंदोलनकर्त्यांवर अत्याचार करणाऱ्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, परीक्षेतील गैरव्यवहारामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तसेच आंदोलनादरम्यान पोलिस कारवाईमुळे जखमी किंवा बाधित झालेल्या आंदोलनकर्त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
करमाळा तालुका बार असोसिएशनने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत शासनाने या प्रकरणात संवेदनशीलतेने भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages