आकाशवाणी वृत्तनिवेदनातील आश्वासक चेहरा : मनोज क्षीरसागर
काळाच्या पडद्याआड जाऊ पाहात असलेल्या रेडिओ युगाला मोबाईलच्या जमान्याने नवसंजीवनी मिळाली आणि आकाशवाणीसह विविध खासगी वाहिन्यांमुळे रेडिओ विश्वाचे पुनरुज्जीवन झाले. या सर्व बदलामध्ये सर्वाधिक आश्वासक ठरला तो आकाशवाणीचा आवाज. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठी बातम्या देणारा हाच आश्वासक आवाज म्हणजे सातारकर मनोज क्षीरसागर. आकाशवाणीतील सेवेच्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातून ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याविषयी...
गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेल्या माध्यमांच्या क्रांतीमध्ये आकाशवाणीचा चेहरा किती समर्थ आणि समर्पक राहिला याविषयी बोलताना मनोज क्षीरसागर म्हणाले की, आज तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलले आहे. पूर्वी हाताने बातमी लिहून अनुवादित करून त्या आकाशवाणीसाठी वापरल्या जात असत. आता इंटरनेटसह सर्वच क्षेत्रात बदल झाल्याने प्रसार माध्यमात काम करणे सहज सोपे झाले आहे असे वाटते. पण तुमचा स्वतःचा अभ्यास आणि सामान्य ज्ञान असल्याशिवाय अशा माध्यमांमध्ये काम करणे अवघड आहे हेही तितकेच खरे.
आपल्या आकाशवाणीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून सांगताना मनोज क्षीरसागर म्हणाले की, माझी प्रथम नियुक्ती ही सांगली आकाशवाणी केंद्रावर झाली होती. तिथे प्रशासकीय कर्त्तव्ये असतानाही माझ्या विविध विषयांमधल्या आवडी लक्षात घेता तेथील कार्यक्रम विभागातील सहकाऱ्यांनी माझ्या कौशल्याचा वापर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये करून घेतला. मग युववाणीच्या विविध उप-कार्यक्रमांसाठी लेखन, ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांशी चर्चा करुन त्यांच्या मुलाखती घेणं, यांचा त्यात समावेश होता. त्यामध्ये मला असे जाणवले की मी चांगले लिहू शकतो, बोलू शकतो. आकाशवाणीच्या त्या सेवेत मी चिंतन आणि कृषीवाणीसाठी माझ्या आवाजात खूप ध्वनीमुद्रण केले. मी नाटक विभागासाठी मान्यताप्राप्त कलाकार होतो. अनेक श्रुतिका, मालिका यांच्यामध्ये सहभाग घेताना माझ्यावर भाषेचे सर्वांगीण संस्कार सुप्तपणे होत होते. आणि त्यांचा लाभ मला वृत्त निवेदक म्हणून परीक्षा देताना आणि या सेवेच्या शेवटपर्यंत झाला. एक प्रकारे सांगलीचा कालखंड म्हणजे माझी आकाशवाणीमधली संस्कारांची मूस होती. त्या काळात सांगली केंद्राद्वारे विविध संगीत संमेलनांचं (कॉन्सर्ट्स) आयोजन केलं जाई. देशभरातले मान्यवर कलाकार, आताचे लोकप्रिय तबलावादक पंडित विजय घाटे, गायिका मंगला जोशी, मधुवंती दांडेकर, शरद जांभेकर अशा नामांकितांचा सहवास त्यावेळी लाभला. त्यामुळे आपोआपच मीही समृद्ध होत गेलो. हा काळ 1988 चा होता. खऱ्या अर्थानं आकाशवाणीचा सुवर्णकाळ होता. आणि त्यातील काही वर्षे का होईना त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं ही मोठी कृपाच म्हणावी लागेल.
मनोज क्षीरसागर यांची आकाशवाणीच्या वृत्त सेवा प्रभागामध्ये दिल्ली इथं मराठी राष्ट्रीय बातमी विभागामध्ये वृत्त निवेदक या पदावर निवड झाली. हा त्यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा क्षण होता. या पदासाठी झालेल्या लेखी आणि स्वरचाचणी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून क्षीरसागर उत्तीर्ण झाले. मुलाखत घेण्यासाठी नामांकित साहित्यिक विद्याधर गोखले, आनंद यादव असे दिग्गज होते, त्यांनी विविध क्लिष्ट प्रश्न विचारुन त्यांची मराठी भाषेची जाण किती आहे ते जोखले. दिल्ली केंद्रावरून मराठी बातम्या देताना राष्ट्रीय पातळीवरचे वृत्त संकलन, सर्व २२ भाषांचे विभाग आणि कोणत्या राज्यात काय घडामोडी सुरू आहेत, याचे प्रत्यक्ष अनुभव आणि एकमेकांमध्ये बातम्यांची देवाणघेवाण असा अनुभव क्षीरसागर यांना आला. त्याचवेळी पीटीआय युएनआय या विश्वासार्ह माध्यम समूहांशी संपर्क झाला. जागतिक मराठी परिषदेचे दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आले होते, त्याच्या आयोजनात सहभाग घेण्याची संधी मिळाली. त्यासह विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वार्तांकन करण्याचा अनुभव मिळाला. देशाच्या राजधानी मध्ये 1992 ते 1996 या काळामध्ये हे काम करत असताना राष्ट्रीय पातळीवरचे भारताचे एक निराळेच चित्र क्षीरसागर यांना येथे अनुभवायला मिळाले.
1996 ते वर्ष 2010 या काळामध्ये नागपूर आकाशवाणी केंद्रावर मनोज क्षीरसागर यांची बदली झाली. इथे प्रादेशिक वृत्त विभागात काम करत असताना प्रादेशिक बातम्यांचे महत्त्व लक्षात आले आणि राज्यस्तरावरील विविध घडामोडी आणि त्याचे वर्तन करताना अनेक अनुभव गाठीशी आले. कालौघामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली आणि एक प्रकारे मल्टी टास्किंग म्हणजे वृत्त विभागाशी निगडीत सर्वच कामे करण्याची जबाबदारी पार पाडावी लागली. बातम्यांची निवड, बातम्यांचा अनुवाद, बातमीपत्राचे संपादन, बातम्यांचे वाचकाला अभिप्रेत असलेले सहज सोपे निवेदन, प्रत्यक्ष बातम्या सादर करणे हा अनुभव फार मोलाचा ठरला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे ग्रामीण भागात फिरून वार्तांकन, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींबरोबर क्षेत्रीय भेटी, विविध कार्यशाळा असा अनुभव गाठीशी आला. नागपूरमध्ये दरवर्षी होत असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे वार्तांकन करता आले हाही एक मोलाचा अनुभव ठरला. विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन असेल किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल अशावेळी मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या मुलाखती घेता आल्या. त्याचबरोबर नागपूरचे ख्यातनाम साहित्यिक कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे, नाटककार महेश एलकुंचवार यांचाही सहवास मिळाला. या सर्व अनुभवातून माझेही व्यक्तिमत्व उजळत गेले असे क्षीरसागर आवर्जून सांगतात.
2010 मध्ये पुण्यामध्ये आल्यानंतर प्रादेशिक वृत्त विभागाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली असे सांगून क्षीरसागर पुढे सांगतात की पुणे हे मुंबईपाठोपाठ महत्वाचे शहर असल्याने इथे सातत्यानं केंद्रीय कार्यक्रम होतात, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, अति महत्वाच्या व्यक्तिंच्या भेटी सातत्याने होत असतात. त्यांचे वार्तांकन करावे लागते, त्यासाठी दौऱ्यावर जावे लागते. पुणे केंद्राच्या अंतर्गत सर्व मान्यवरांचे कार्यक्रम तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह लष्कराची मुख्य कार्यालये, संस्था इथे असल्यामुळे जास्तच मोठ्या जबाबदारीने येथे काम करणे आवश्यक ठरले. अशा विविध कार्यक्रमांच्या अहवालाचे इंग्लिश मध्ये रूपांतर करून ते दिल्लीला पाठवणे ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी होती. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसिद्ध होणाऱ्या प्रादेशिक बातम्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बातम्या असं होतं. या बातम्या सादर करताना असलेली जबाबदारी आणि वेळेचे भान आणि योग्य शब्दांची निवड यामध्ये कसोटी लागली असे क्षीरसागर सांगतात. त्याचबरोबर सहकाऱ्यांचे निरंतर प्रशिक्षण आणि त्यांच्यामधील सजगता वाढवण्याचे दररोजचे उपक्रम आकाशवाणीच्या बातम्या अधिकाधिक विश्वासार्ह आणि श्रोत्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी महत्वाचे ठरले. बारामती इथं झालेल्या नाट्यसंमेलनाचे प्रत्यक्ष वार्तांकन, आणि विशेष वार्ता सदरातून ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेता आल्या.
आपल्या 38 वर्षांच्या यशस्वी कारकिर्जीबद्दल मनोज क्षीरसागर सांगतात की माझे कऱ्हाडमधले शिक्षण हे या सर्व यशाचा पाया ठरले आहे. कऱ्हाडच्या सांस्कृतिक वातावरणाचे संस्कार होणे हा मोठा कृपेचाच भाग होता. सायन्स कॉलेजमधील पदवीपर्यंतचे शिक्षण, कृष्णाबाईच्या घाटावरील उत्सव, नाटके, त्यावेळी तिथे नगरपालिकेच्या इमारतीत असलेले वाचनालय, तिथे येत असलेली विविध नियतकालिके, त्यामधील लेख, नॅशनल जिओग्राफीक आणि पंचसारखी नियतकालिके त्याकाळी तालुक्यासारख्या ठिकाणी वाचायला मिळणं, यामधून संपूर्ण जगाचे एक सम्यक चित्र आणि ऐन तारुण्यात समोर उभे राहत असे. त्यामुळे या सोनेरी दिवसांना क्षीरसागर कधीही विसरू शकत नाहीत. आज आकाशवाणी ऐंशी वर्षांची होत असताना, त्यातील चौतीस वर्षांचा कार्यकाळ वृत्त निवेदनासाठी देता आला ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे असे त्यांना वाटते. या कामाच्या दरम्यान सर्वच ठिकाणी भेटलेल्या सहकाऱ्यांना देखील ते आपल्या यशाचं श्रेय देतात.
Happy parenting हा शब्दही अस्तित्वात यायच्या आधी वडील (कै.) श्री. वामनराव आणि आई निलाक्षी यांनी जन्मापासून केलेले सर्वांगीण आणि विशेषतः भाषेचे संस्कार तसेच ज्येष्ठ बंधु चंद्रशेखर (महावितरण-अभियंता), श्रीकृष्ण (आकाशवाणीतच अभियंता), डॉ. संजय (अस्थिरोग तज्ञ) आणि पत्नी सौ. वैशाली असा सर्वव्यापी पाठिंबा मिळत गेला... त्यामुळे आपले जीवन जे घडले या सगळ्याला परमेश्वराची कृपा आणि कुटुंब यांचा पाठिंबा गरजेचा आहे असे क्षीरसागर यांना आवर्जून वाटते.
नेत्रहीन व्यक्तीतर्फे वृत्त वाचन
सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये एक वेगळा प्रयोग पुणे आकाशवाणीतर्फे करण्यात आला होता. त्यावेळी एका नेत्रहीन व्यक्तीतर्फे या बातम्या पुणे केंद्रावर दिल्या गेल्या होत्या. त्यामध्ये पुणे अंधजन संस्थेचे प्रमुख धनराज पाटील यांच्यासमवेत मनोज क्षीरसागर यांनी बातमीपत्राचे वाचन केले होते. हा एक अत्यंत निराळा अनुभव ठरला. दोघांच्या वार्तांकनामधील परस्पर संयोजनाचा अनुभव क्षीरसागर यांना घेता आला.

No comments:
Post a Comment