अकलूज उपविभागीय अधिकारी यांना वाहतुकीच्या समस्या बाबत निवेदन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय नितीन भांड यांनी नातेपुते येथील ग्रामस्थांना व व्यापाऱ्यांना वाहतुकीच्या येणाऱ्या समस्येबाबत व येथील वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी अकलूज उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांना निवेदन देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की, नातेपुते शहरातील महिला भगिनी दैनंदिन कामासाठी बाहेर पडताना होणारी धावपळ आणि त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न, शालेय विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांचा वाहतुकीच्या समस्येमुळे वाया जाणारा मौल्यवान वेळ,
व्यापारी व नागरिकांना अरुंद रस्ते आणि वाहनांच्या गर्दीमुळे व्यापारावर विपरीत होणारा परिणाम व त्यामुळे ग्राहकांना बाजारात येणे कठीण तसेच
रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा यासाठी मुख्य रस्त्यावरील कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना रस्ता मिळत नाही त्यामुळे रुग्णांच्या ते जीवावर बेतू शकते. त्यासाठी नातेपुते शहरातील मुख्य चौकात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करणे, अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी वेळेचे बंधन आणि नो-पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी करणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरासाठी प्रभावी 'ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन' तयार करणे अशा विविध मागण्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय नितीन भांड यांनी अकलूज उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांना लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर देण्यात आलेल्या निवेदनाबाबत सकारात्मक विचार करून त्याची लवकरच अंमलबजावणी करू असे सांगितले.

No comments:
Post a Comment