सीना नदीला अखेर पाणी मिळणार; आ. अभिजीत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2026

सीना नदीला अखेर पाणी मिळणार; आ. अभिजीत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सीना नदीला अखेर पाणी मिळणार; आ. अभिजीत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या माढा तालुक्यासह सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सीना नदीत तातडीने पाणी सोडण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामागे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनापासून जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) बैठकीपर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्याला यश आल्याचे सांगितले जात आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे माढा तालुक्यासह सीना नदी परिसरातील अनेक गावांमध्ये पेरणीनंतर पिकांची वाढ खुंटली आहे. नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता. नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अभिजीत पाटील यांनी हा प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.
विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी सीना नदीतील पाणीप्रश्न वारंवार उपस्थित केला. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन सीना नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली. उजनी धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर माढा तालुक्याचा हक्काचा पाणीहिस्सा सीना नदीत सोडण्यात यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी शासनासमोर मांडली.
यासोबतच सीना–माढा उपसा सिंचन योजना, मानेगाव उपसा सिंचन योजना तसेच बोगद्यातून सीना नदीला पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रलंबित योजनांनाही गती देण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. या योजनांची अंमलबजावणी झाल्यास भविष्यात माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रिधोरे येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनासाठी पोलिसांची आवश्यक परवानगीही घेण्यात आली होती. मात्र शासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सीना नदीत लवकरच पाणी सोडण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत आमदार अभिजीत पाटील म्हणाले, "लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करणे हे माझे कर्तव्य आहे. टीका करणारे टीका करतील; मात्र मी माझ्या बळीराजाच्या हितासाठी प्रत्येक स्तरावर लढत राहणार आहे. शासनाकडे केलेला प्रत्येक पाठपुरावा, सादर केलेली प्रत्येक मागणी आणि घेतलेली भूमिका जनतेसमोर पारदर्शकपणे मांडली आहे. त्यामुळे अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवू नये."
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीप्रमाणेच सीना नदीतही लवकरच पाणी सोडले जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच "पंढरपूरच्या विठुरायाच्या आणि आई माडेश्वरीच्या कृपेने राज्यात भरपूर पाऊस पडो, उजनी धरण शंभर टक्के भरू दे आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो," अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
सीना नदीतील पाणीप्रश्नावर झालेल्या या सकारात्मक घडामोडीमुळे माढा तालुक्यासह नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि नदीत तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी अपेक्षा आता परिसरातील हजारो शेतकरी व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages