पटवर्धनकुरोलीसाठी स्वतंत्र कृषी सहाय्यकाची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पटवर्धनकुरोली या महसूल मंडळाच्या मुख्यालयासाठी स्वतंत्र कृषी सहाय्यकाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.
पटवर्धनकुरोली हे सुमारे सहा ते सात हजार लोकसंख्येचे मोठे गाव असून, आजमितीस या गावासाठी स्वतंत्र कृषी सहाय्यक उपलब्ध नाही. सध्या अतिरिक्त पदभारावरील कृषी सहाय्यकांकडे तीन ते चार गावांची जबाबदारी असल्याने त्यांना पटवर्धनकुरोलीसाठी पूर्णवेळ सेवा देता येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
यामुळे फळबाग लागवड अनुदान, रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी कामे, पीक विमा, कृषी पीक व पाणी व्यवस्थापनाबाबतचा सल्ला तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नदीकाठावरील गाव असल्याने येथे फळबाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कृषीविषयक मार्गदर्शनासाठी स्वतंत्र कृषी सहाय्यकाची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या मागणीचे निवेदन उपविभागीय कृषी अधिकारी, पंढरपूर सौ. दिपाली जाधव यांना देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, रमेश पवार, रणजीत उपासे, राहुल नाईकनवरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

No comments:
Post a Comment