उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त) : उत्तर सोलापूर तालुक्यासह परिसरात मान्सूनच्या पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावली नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र सुरू होऊन आठ ते दहा दिवस उलटून गेले तरीही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत, नांगरणी, कुळवणी तसेच पाळी घालण्याची कामे पूर्ण केली असून पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची खरेदी करून सर्व तयारी केली असली तरी पावसाअभावी प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याकडून पावसाबाबत विविध अंदाज वर्तविले जात असले तरी प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात पाऊस पडत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. वेळेवर पाऊस पडून पेरण्या झाल्यास पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. मात्र, पावसाचा विलंब वाढत गेल्यास पेरणी उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
चौकट
पाऊस न झाल्यास नियोजन विस्कळीत
सध्या ग्रामीण भागात शेतकरी पावसासाठी देवाकडे साकडे घालत असून ‘पाऊस कधी बरसणार?’ हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.
No comments:
Post a Comment