शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार
टेंभुर्णी ( प्रतिनिधी):- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 12 जूनपासून पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीमानगर चौकात डी.व्ही.पी. बँकेचे अध्यक्ष औदुंबर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रोहित पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, “गेल्या 3-4 वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी-शर्तींमुळे बहुतांश गरजू शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत.”छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेने विठुरायाच्या पंढरीत 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे. सर्वांनी या लढ्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कर्जमाफी योजनेतील अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, ही रोहित पवार यांची प्रमुख मागणी आहे. त्यांच्या या आंदोलनाकडे राज्यातील शेतकरी संघटना व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावेळी बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, संदीप कुटे, नवनाथ शिंदे, विशाल मस्के, गणेश मुळे, अंबादास महाडिक, नवनाथ महाडिक, सुधीर पाटील, बापू गलांडे, अक्षय धोत्रे, पांडुरंग देशमुख, लखन वाघमोडे, सागर खोले, प्रमोद शिंदे व राजू बनसोडे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment