वैराग पोलीस ठाण्याकडून विद्यामंदिर हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम..
वैराग (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासन व पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान” अंतर्गत वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने वैराग येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित नागरिकांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना अंमली पदार्थांचे विविध प्रकार, त्यांचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. तसेच युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी आवश्यक उपाय, तसेच अमली पदार्थांचे सेवन, बाळगणे, वाहतूक, विक्री किंवा त्यास प्रोत्साहन देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील तरतुदी व शिक्षेच्या बाबतीतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संशयास्पद हालचाली किंवा अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाणे अथवा डायल ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घेत समाजात जनजागृती करण्याचा संकल्प केला. “व्यसनमुक्त युवा – सुरक्षित भारत” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात माननीय पोलीस निरीक्षक श्री. कुंदन गावडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, मु. श्री. इंगळे सर, चेअरमन मृणाल भूमकर सर, आवारे सर, राजमाने सर, उजनकर सर, रेडी सर तसेच गोपनीय अंमलदार किसन कोलते, पोलीस अंमलदार गणेश चव्हाण आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment