कुलगुरूंसमोरच उधळला भंडारा; अहिल्यादेवी स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून भर बैठकीत गोंधळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 25, 2026

कुलगुरूंसमोरच उधळला भंडारा; अहिल्यादेवी स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून भर बैठकीत गोंधळ

 कुलगुरूंसमोरच उधळला भंडारा; अहिल्यादेवी स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून भर बैठकीत गोंधळ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याच्या मुद्द्यावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बैठकीत सोमवारी चांगलाच गदारोळ झाला. स्मारकाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीदरम्यान हा विषय चर्चेला आल्यानंतर वातावरण काही काळ तापले. सदस्य शरू हांडे यांनी आक्रमक भूमिका घेत कुलगुरूंसमोरच भंडारा उधळत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. स्मारकाच्या कामातील दिरंगाईबाबत त्यांनी प्रशासनाला जाब विचारत तातडीने कार्यवाहीची मागणी केली.
अहिल्यादेवी होळकर यांचे नाव धारण करणाऱ्या विद्यापीठातच त्यांच्या स्मारकाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण राहणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. स्मारक उभारणीसंदर्भात यापूर्वी अनेक बैठकींमध्ये चर्चा झाली, विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला, मात्र प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
सदस्यांनी प्रशासनाकडे स्मारकाच्या प्रस्तावाची सद्यस्थिती, निधीची उपलब्धता, तांत्रिक मंजुरी आणि काम सुरू होण्याची निश्चित कालमर्यादा याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली. स्मारक हा केवळ विकासाचा विषय नसून विद्यापीठाच्या अस्मितेशी आणि ऐतिहासिक वारशाशी निगडित असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत अनेक सदस्यांनी नोंदविले.
दरम्यान, बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी या विषयाचा सविस्तर आढावा घेऊन स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे समजते. मात्र, यानंतर प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे विद्यापीठ परिसरासह विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages