आळजापूरच्या वनसंपत्तीवर डल्ला; 15 एकर क्षेत्रातील वृक्षतोड प्रकरणी 19 जण गजाआड
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील आळजापूर येथे वन विभागाच्या राखीव जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याप्रकरणी वन विभागाने धडक कारवाई करत 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आळजापूर येथील वन विभागाच्या गट क्रमांक 176, 177, 178, 179 व 182 मध्ये एकूण सुमारे 103 एकर क्षेत्र आहे. यापैकी जवळपास 15 एकर क्षेत्रातील झाडे तोडून सुमारे 20 कुटुंबांनी अतिक्रमण केल्याचे उघड झाले. तोडण्यात आलेल्या वृक्षांचे लाकूड खुलेआम पिक-अप वाहनांद्वारे विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीने तक्रार दाखल केल्यानंतर वन विभागाने तपास सुरू केला. दरम्यान, कारवाईसाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना काही वृक्षतस्करांनी अडवून ठेवल्याची गंभीर घटना देखील घडल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात वन विभागाने संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईत दोन सहाय्यक वन संरक्षक, सहा वन परीक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह सुमारे 50 ते 60 वन कर्मचारी तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे 20 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व 19 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. करमाळा येथील कोठडीत जागा उपलब्ध नसल्याने सर्व आरोपींना पुढील कोठडीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले.
---चौकट---
"तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. तसेच तोडण्यात आलेले लाकूड कुठे व कोणाला विक्री करण्यात आले, याची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधित दोषींवर वन कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल."
— अजित शिंदे, सहाय्यक वन संरक्षक

No comments:
Post a Comment