मोटेगावकरने स्वत:च्या मुलासाठी NEET पेपर फोडला? CBI तपासात धक्कादायक माहिती समोर
मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील नामांकित 'आरसीसी' (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
तत्पूर्वी सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांच्या कसून चौकशीत मोटेगावकरच्या विरोधात अत्यंत भक्कम आणि महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे शिवराज मोटेगावकर याने स्वत:च्या मुलासाठी NEET पेपर फोडल्याचा संशय सीबीआयला आहे.
लातूरमधील घरात सीबीआयला सापडला महत्त्वाचा पुरावा
सीबीआयने लातूर येथे केलेल्या तपासादरम्यान शिवराज मोटेगावकर याच्या घरावर छापा टाकला होता. या झाडाझडतीत सीबीआयला त्याच्या घरातून 'केमिस्ट्री' (रसायनशास्त्र) विषयाची नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका हस्तगत करण्यात यश आले. दोन दिवसांपूर्वी लातुरात प्रा. कुलकर्णी याला सीबीआयने अटक केली. एनटीएमध्ये (परीक्षा प्रक्रिया) कुलकर्णी याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. त्यानेच ही प्रश्नपत्रिका मोटेगावकर याला दिल्याचा संशय आहे. दुसरीकडे मोटेगावकर याच्या घरातच थेट प्रश्नपत्रिका सापडल्याने त्याचा या पेपरफुटीतील थेट सहभाग आता उघड झाला असून त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
स्वतःच्या मुलासाठी पत्करला एवढा मोठा धोका?
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी शिवराज मोटेगावकर याचा स्वतःचा मुलगा देखील बारावीत होता आणि त्याने नीटची परीक्षा दिली होती. त्यामुळे मोटेगावकराने स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्तीत जास्त गुण मिळावेत, याच उद्देशाने नीटचा पेपर फोडला असावा, यादृष्टीने सीबीआय आता कसून तपास करत आहे. मुलाच्या भविष्यासाठी आणि त्याला डॉक्टर बनवण्यासाठीच मोटेगावकराने पेपरफुटीसारखा एवढा मोठा कायदेशीर धोका पत्करल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका मिळाली, पालकांकडून उकळले लाखो रुपये?
स्वतःच्या मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवल्यानंतर मोटेगावकरने याचा व्यावसायिक फायदा उठवल्याचा संशय सीबीआयला आहे. आपल्याकडे आलेल्या या प्रश्नपत्रिकेच्या आधारे त्याने लातूर आणि परिसरातील इतर गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. मुलांना नीट परीक्षेत हमखास यश मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्याने अनेक पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचा संशय सीबीआयला आहे.
सीबीआय कोठडीत मोठे खुलासे होण्याची शक्यता
न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावल्यामुळे आता सीबीआय मोटेगावकरची दिल्लीत कसून चौकशी करत आहे. या ९ दिवसांच्या काळात त्याने हा पेपर नेमका कोणाकडून मिळवला? या रॅकेटमध्ये दिल्ली, राजस्थान किंवा इतर राज्यातील कोणत्या मोठ्या टोळ्यांचा हात आहे? आणि लातूरमधील आणखी किती पालकांनी त्याला पैसे दिले होते? अशा सर्व प्रश्नांचा खुलासा होणार आहे.

No comments:
Post a Comment