टेंभुर्णीत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 23, 2026

टेंभुर्णीत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न

 टेंभुर्णीत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न

टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-  टेंभुर्णी येथील छावा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारक परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण टेंभुर्णी नगरी भगव्यमय झाली होती.
जयंतीनिमित्त १४ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
त्यानंतर २० मे रोजी संध्याकाळी सात वाजता छावा चौकातून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.
या मिरवणुकीत आकर्षक छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य दिव्य मूर्ती हे सर्वांचे लक्ष मधून घेत होती ढोल-ताशा पथके, भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि महाराजांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे जिवंत देखावे हे विशेष आकर्षण ठरले. छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. तो देखावा पाहताना अनेकांच्या अंगावर शहारे येत होते.
“जय भवानी, जय शिवाजी”, “धर्मवीर संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. टेंभुर्णी व परिसरातील हजारो शिवभक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages