राज्यात उष्णतेची तीव्र लाट! तीन महिन्यांत उष्माघाताचे 163 रुग्ण
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात उष्म्याचा तडाखा वाढता असून, एक मार्च ते तीन मे या कालावधीत राज्यात उष्माघाताचा त्रास झालेल्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाकडून वैद्यकीय विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे मृत्यू नेमके कोणत्या कारणांमुळे झाले याबाबत निश्चितपणे सांगता येणार आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्णसंख्या ही छत्रपती संभाजीनगर येथे नोंदवण्यात आली असून, येथे ४६ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नंदुरबार येथे २२, नाशिकमध्ये १४, अमरावतीमध्ये १० आणि बुलढाणा येथे ११ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. किनारी भागामध्ये तापमान आणि आर्द्रतेमुळे गंभीर उष्माघाताच्या रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसते.
अहिल्यानगरमध्ये दोन, सोलापुरात एक मृत्यू
मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढता असला तरीही उष्माघाताचा त्रास झालेल्या एकाही रुग्णाची नोंद अद्याप झालेली नाही, तर ठाणे येथे एका व्यक्तीला त्रास झाल्याचे दिसते. अहिल्यानगर येथे दोन, तर सोलापूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे. राज्यामध्ये उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
विजेची मागणी गेली तीस हजार मेगावॉटवर
चंद्रपूर वीज केंद्रातील ५०० मेगावॉटचा नववा संच बॉयलर ट्यूब लिकेजने सोमवारी रात्री अडीच वाजता बंद पडला. या संचाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज, बुधवारी सकाळपर्यंत तो पूर्ववत सुरू होण्याचे स्पष्ट संकेत वीज केंद्राच्या सूत्रांनी 'मटा'शी बोलताना दिली. वीज केंद्राचे तीन ते आठपर्यंतचे सर्व संच सुरळीत सुरू असून मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वीज केंद्र सज्ज असल्याची पुष्टीही सूत्रांनी जोडली.
राज्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी उकाडा कायम आहे. त्यामुळे विजेची मागणी यंदाच्या मोसमात मंगळवारी प्रथमच ३० हजार मेगावॅटवर पोहोचली. परिणामी महावितरणसमोर ही यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे आणि ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

No comments:
Post a Comment