शिवरायांच्या पुतळ्याचे शांततेत स्थलांतर
अंजनगावातील तणाव निवळला
माढा (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून चार दिवसांपासून उद्भवलेला तणाव शनिवारी (ता. ४) दुपारी शांत झाला. येथील खेलोबा मंदिर परिसरात मंगळवार (दि. ३१) पहाटे अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला होता.
मंदिराच्या जागेत हा पुतळा बसवून गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.
पुतळ्याचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीस विरोध दर्शविला गेल्याने चार दिवसांपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरा प्रशासनाच्या शिष्टाईला यश आले अन् वाद निवळला. शनिवारी (ता. ४) दुपारी तीनच्या सुमारास पुतळ्याचे स्थलांतर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर केल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अंजनगाव येथे भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. परिसरात शांततेचा भंग करणे, पोलिसांवर व अधिकाऱ्यांवर दगडफेक करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, विनापरवाना आंदोलन करणे या विरोधात सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
हाती आलेल्या पुराव्यानुसार हे गुन्हे दाखल झाले असून विविध ठिकाणचे फुटेज तपासून अजून नव्याने गुन्हे दाखल होणार आहेत. विशेषतः बाहेरून येणाऱ्या लोकांनी फूस लावून शांतता भंगाचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. शांतता भंग करणाऱ्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या विरोधातही कडक कारवाईचे संकेत त्यांनी दिले. प्रसारमाध्यमांनीही अतिरंजीतपणा टाळून विधायक कामाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार अभिजित पाटील उपस्थित होते.
चार दिवसांच्या तणावपूर्ण परिस्थितीत काल सायंकाळी उशिरा मोहोळ येथे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी ग्रामस्थासमवेत बैठक झाली. त्यानंतर विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राजन पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, गुन्हे अन्वेषणचे संजय जगताप यांनी गावातील दोन्ही गटांशी चर्चा केली.
दोन्ही गटांना प्रस्ताव मान्य
बैठकीत प्रशासनाने मांडलेला पुतळा स्थलांतराचा प्रस्ताव दोन्ही गटांनी मान्य केला. पोलिस प्रशासनाने आज सकाळपासूनच तगडा बंदोबस्त ठेवला होता. मोहोळ माढा मार्ग बंद ठेवून अंजनगाव येथे बाहेरून येणारी गर्दी थांबविण्यात आली. क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने पुतळ्याचे स्थलांतर करण्यात आले.

No comments:
Post a Comment