बचेरी ग्रामस्थांनी विविध विकासकामांसाठी राम सातपुते यांची भेट
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- बचेरी गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अनेक महत्त्वाच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा होत संबंधित प्रशासनाला तातडीने सूचना देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
प्रा. सदाशिव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बचेरी भाजप अध्यक्ष पै. रामभाऊ गोरड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार सातपुते यांची भेट घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी शिंदे, बालाजी गोरड, संतोष खेडेकर, लहू माने तसेच मधुकर दडस उपस्थित होते.
बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी गावातील शाळेसाठी नवीन 12 वर्गखोल्यांची मागणी केली. या मागणीची दखल घेत आमदार सातपुते यांनी त्यापैकी 6 वर्गखोल्यांना तातडीने मंजुरी मिळण्यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
तसेच, भोजलिंग गोरड वस्ती परिसरात अतिरिक्त विद्युत पंप डीपीची आवश्यकता असल्याचे बालाजी गोरड यांनी निदर्शनास आणून दिले. या मागणीवरही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित ठिकाणी डीपी उभारणीसाठी शिफारस करण्याबाबत स्वीय सहाय्यकांना निर्देश देण्यात आले.
दरम्यान, गावठाणातील घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर मधुकर दडस यांनी निवेदन सादर केले. ग्रामपंचायत व संबंधितांकडून या प्रकरणात टाळाटाळ होत असल्याची तक्रार करण्यात आली. याची गंभीर दखल घेत आमदार सातपुते यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
याशिवाय ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते, मुरमीकरण, बौद्ध वस्ती सुधार निधी, सभामंडप उभारणी आदी विविध विकासकामांसंदर्भातील मागण्यांचे निवेदनही रामभाऊ गोरड यांनी सादर केले. सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार सातपुते यांनी यावेळी दिले.
ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देत जागेवरूनच प्रशासनाशी संपर्क साधून कामांना गती देण्याची भूमिका घेतल्याने आमदार राम सातपुते यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आपुलकीची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment