महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट; ७ जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर २७ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट; ७ जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर २७ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट

 महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट; ७ जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर २७ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट




मुंबई (कटूसत्य वृत्त):- हवामान विभागाने १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिकसह ७ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मार्च महिन्यातील तडाख्यानंतर आता एप्रिलच्या सुरुवातीलाही वरुणराजा विश्रांती घेण्याच्या मनस्थितीत नाही. हवामान विभागाने १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील तब्बल ३३ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये ७ जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याने 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, उर्वरित जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहतील. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

नाशिक आणि अहिल्यानगरला (नगर) ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिवमध्येही वादळाचा वेग अधिक असेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. शेतकरी बांधवांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे, तर नागपूर, अमरावतीसह इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात मुंबई-पालघरमध्ये केवळ ढगाळ वातावरण असेल, मात्र ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागेल.

ऑरेंज अलर्ट (अधिक धोका): पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, यवतमाळ.

यलो अलर्ट (सतर्कता): ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, वाशिम.

"हवामान अस्थिर असल्याने गरज असल्यासच घराबाहेर पडा. झाडाखाली किंवा पत्राच्या शेडखाली आश्रय घेणे टाळा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा." - भारतीय हवामान विभाग (IMD)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages