भ्रष्टाचारमुक्त पालिकांसाठी जागरूक मतदारांची भूमिका महत्त्वाची-हेमंत पाटील
पुणे (कटूसत्य वृत्त):- भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या, भ्रष्टाचाराला खतपाणी न घालणाऱ्या उमेदवारांनाच नागरिकांनी निवडून दिले पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका व पारदर्शक प्रशासनासाठी जागरूक आणि भ्रष्टाचारविरोधी नागरी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१३) केले. जातपात, आमिषांना बळी न पडता प्रत्येकाने येत्या १५ जानेवारीला होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना योग्य उमेदवार निवडून देऊन शहराच्या विकासाला दिशा देण्याचा अधिकार मतदानातून मिळतोय. त्यामुळे हे अमूल्य मत विकासाभिमुख, प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणाऱ्या उत्तम उमेदवारांनाच द्यावे. प्रभागातील स्वच्छता, आरोग्य यंत्रणा, शिक्षण तसेच पाणीपुरवठ्यासह स्थानिक मुद्द्ये लक्षात घेवून मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना प्रलोभने देण्याचे प्रकार वाढतात. पैसे वाटप, वस्तूंचे आमिष दाखवणे अशा गैरप्रकारांना नागरिकांनी बळी पडू नये. मतदार हा लोकशाहीचा कणा असून त्याने सजग व जबाबदार भूमिका घेतली पाहिजे. तात्पुरत्या लाभासाठी मत विकणे म्हणजे आपल्या शहराच्या भविष्यास धोका निर्माण करणे होय, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि जनहिताभिमुख करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचे, भ्रष्टाचारमुक्त नेतृत्व निवडून देणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदाराने आपले मत योग्य ठिकाणी वापरून लोकशाही मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही हेमंत पाटील यांनी यावेळी केले.

0 Comments