Hot Posts

6/recent/ticker-posts

डिजिटल न्यायक्रांतीकडे सोलापूरची वाटचाल

 डिजिटल न्यायक्रांतीकडे सोलापूरची वाटचाल




ई-कोर्ट प्रशिक्षण शिबिर यशस्वी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- e-Committee,  सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या वतीने ECT_12_2025 या विशेष ई-कोर्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात आले. सकाळी 9.30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात या प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
या प्रशिक्षण शिबिरात ई-फायलिंग, ई-कोर्ट प्रणाली, ऑनलाईन न्यायप्रक्रिया तसेच न्यायालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ज्युनिअर व सीनियर वकिल तसेच वकिलांचे लिपिक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले.
या कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून अ‍ॅड. किरण घाडगे व अ‍ॅड. किरण अंकुशराव यांनी ई-कोर्ट प्रणालीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर बार असोसिएशनचे सेक्रेटरी अ‍ॅड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय खजिनदार अ‍ॅड. अरविंद देडे यांनी करून दिला.
प्रशिक्षकांचा सत्कार सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब जाधव व उपाध्यक्ष अ‍ॅड. रियाज शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरात सुमारे 200 ते 250 वकील व त्यांचे क्लर्क मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी सदस्यांसाठी अल्पोपहार, जेवण तसेच स्टेशनरीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उपस्थितांना आकर्षक ऑफिस बॅगही देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक खमीतकर, लालसंगी तसेच आयटी व सिस्टीम विभागातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
या प्रशिक्षणामुळे सोलापूर न्यायालयीन परिसरातील वकील व त्यांच्या लिपिकांमध्ये ई-कोर्ट व डिजिटल न्यायप्रणालीबाबत जागरूकता, कौशल्य आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली असून, डिजिटल न्यायक्रांतीकडे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments