Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील नऊ अतिक्रमणे हटवली

 ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील नऊ अतिक्रमणे हटवली




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील व लगतच्या अतिक्रमणांबाबत वारंवार सूचना व नोटिसा देऊनही अतिक्रमणधारकांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने, ग्रामपंचायत ठरावानुसार पोलीस बंदोबस्तात एकूण नऊ अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती सरपंच सुरजा बोबडे यांनी दिली.
सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच सुरजा बोबडे बोलत होत्या. दिवसभरात काढण्यात आलेल्या अतिक्रमणांपैकी आठ अतिक्रमणधारकांनी पोलीस बंदोबस्त, जेसीबी मशीन व कर्मचारी दल पाहून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली, तर ग्रामपंचायत आवारातील एका महिलेचे राहते पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.
या कारवाईवेळी भाजप तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, सरपंच सुरजा बोबडे, उपसरपंच राजश्री नेवसे, ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंखे, विस्तार अधिकारी औदुंबर शिंदे, विस्तार अधिकारी डी. एन. मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे, बाळासाहेब ढगे, जयवंत पोळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने सन २०२४ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील व लगत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. तसेच फेब्रुवारी २०२५ मध्ये अतिक्रमण हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, माणुसकीच्या नात्याने ग्रामपंचायतीने काही काळासाठी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली होती, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याबाबत बोलताना सरपंच सुरजा बोबडे म्हणाल्या की, “अतिक्रमण काढण्यात आलेल्या नागरिकांसाठी भविष्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत ९२० घरकुले मंजूर करण्यात आली असून, जास्तीत जास्त गरजू नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील.”

Reactions

Post a Comment

0 Comments