समाजसुधारकांमुळे आज राष्ट्र प्रगतीच्या उंबरठ्यावर- श्रीमंत कोकाटे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले यांनी राष्ट्राचा आत्मस्वाभिमान जागवला. शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन पोहोचवली. सावित्रीबाईंचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे .महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई या समाजसुधारकांमुळे आज राष्ट्र प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले. नातेपुते केंद्रस्तरीय किशोरी मेळावा पाठकवस्ती मांडवे येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी इतिहासाचे अभ्यासक प्रशांत सरुडकर होते. जिल्हा परिषद शाळांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचा जयंती समारंभ महिला व किशोरी प्रबोधन दिवस म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी किशोरी आणि महिला यांचा मेळावा घेण्यात आला. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका, उत्कृष्ट कवियत्री आणि समाजासाठी जीवन अर्पण करणाऱ्या समाजसेविका म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या विविध कार्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन विद्यार्थिनींनी उच्चशिक्षित व्हावे, महिलांनी आपले कुटुंब आणि राष्ट्र सुधारण्यासाठी आधुनिक विज्ञानवादी विचाराचा वसा धारण करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना प्रशांत सरुडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि समाज प्रबोधनाची चळवळ या विषयावरती आपले मत व्यक्त केले. यावेळी डॉ. सुचिता सावंत, आरोग्य अधिकारी मांडवे यांनी स्त्रियांचे आरोग्य, त्यांचे आजार व त्यांचा आहार या विषयावरती प्रबोधन केले. या समारंभासाठी समाजसेवक राहुल रुपनवर, सरपंच तात्यासाहेब शिंदे ,बबन बापू पालवे, प्रशांत पाटील ,विठ्ठल पालवे, पिनू पालवे , प्रणव थोरात,मुख्याध्यापक निलेश उंबरजे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा रुपनवर ,उपाध्यक्ष अभिजीत जगताप, विद्या झेंडे, संदीप तोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण कुंभार यांनी केले आभार महादेव पालवे यांनी मानले.

0 Comments