Hot Posts

6/recent/ticker-posts

विमानसेवा, रिंगरोड, कार्गो विमानतळाचा भाजपाचा संकल्प - रोहिणी तडवळकर

 विमानसेवा, रिंगरोड, कार्गो विमानतळाचा भाजपाचा संकल्प - रोहिणी तडवळकर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला आहे. गुंठेवारीचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे, नागरिकांवरील करांचा बोजा कमी करणे तसेच बांधकाम परवानगी प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा ठाम निर्धार भाजपाच्या जाहीरनाम्यात करण्यात आला असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.

जन्म-मृत्यू दाखले विभागीय कार्यालयातच उपलब्ध करून देण्यात येणार असून सोलापूर ते तिरुपती, हैद्राबाद व बंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे. होटगी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता बोरामणी विमानतळ सुरू करून तेथे कार्गो विमानतळ उभारण्यात येणार असल्याचेही भाजपाने स्पष्ट केले आहे.

भाजपाच्या मागणीनुसार मंजूर झालेले उड्डाणपूल, अंडरपास तसेच रिंगरोड प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. पूरस्थितीनंतर लक्षात आलेल्या आदिला नदीचा प्रवाह रुंद करणे, तसेच इतर नाल्यांचा विकास आराखडा राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासोबतच प्राणी संग्रहालय सुरू करून त्याचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे जाहीरनाम्यात नमूद आहे.

बोरामणी विमानतळ आणि आयुर्वेदिक दवाखाना उभारणे ही दोन नवी महत्त्वाची कामे जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. “सबका साथ, सबका विकास” हा केंद्र व राज्य सरकारचा विकासाचा अजेंडा सोलापूरसाठीही राबवण्यात येणार असल्याचे तडवळकर यांनी सांगितले.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी पाईपलाईन टाकण्याच्या योजनेसाठी आधीच ८९२ कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली आहे. यासोबतच आयटी पार्क उभारणी, विविध शहरांशी विमानसेवा, एमआयडीसी भागात प्राथमिक सुविधा, महिलांसाठी उद्योगनिर्मिती, बससेवा बळकटीकरण, प्राणी संग्रहालय, गुंठेवारी प्रश्न निकाली काढून धूळमुक्त शहर घडवणे हे भाजपाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासाच्या मुद्द्यावरच भाजप ही निवडणूक लढवत असून सोलापूरचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास साधण्याचा संकल्प पक्षाने केला असल्याचे रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.



Reactions

Post a Comment

0 Comments