महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मूलभूत सुविधांवर भर - अशोक निम्बर्गी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आपला जाहीरनामा लवकरच जाहीर करणार असून शहरातील मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा स्पष्ट निर्धार करण्यात आला आहे. रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सेवा या महत्त्वाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या समन्वयकांनी दिली.
नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या कर व विविध शुल्काच्या प्रत्येक रुपयाचा मोबदला दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, हा जाहीरनाम्याचा मुख्य गाभा असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा कार्यान्वित झाली असून विविध पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, महाविकास आघाडी विकासाचा अजेंडा मतदारांसमोर ठेवून मतांची मागणी करणार आहे.
महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), मनसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संयुक्त जाहीरनाम्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, नव्याने रस्ते बांधकाम, पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय तसेच ड्रेनेज लाईनचे नियोजनबद्ध काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
यासोबतच नियमित व पुरेसा पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर आणि पारदर्शक प्रशासन राबवण्याचा संकल्प जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवून विकासाभिमुख व लोकाभिमुख महापालिका चालवली जाईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
स्वच्छ, सुंदर, आरोग्यसंपन्न, शिक्षणयुक्त तसेच भय व भ्रष्टाचारमुक्त शहर उभारण्याचा संकल्प जाहीरनाम्यात असून पाणी, रस्ते, दिवाबत्ती, मलनिःसारण व्यवस्था यांसह सर्व मूलभूत सुविधांतील अडचणी दूर करून नागरिकांना भरलेल्या कराचा शंभर टक्के मोबदला देणारी महापालिका अस्तित्वात आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. प्रा. अशोक निम्बर्गी समन्वयक, महाविकास आघाडी.
.png)
0 Comments