विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; वाचन व स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित
सोलापूर :(कटूसत्य वृत्त):-
येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय, सोलापूर यांच्या वतीने सन २०२५–२०२६ या वर्षातील वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या व नैपुण्य मिळविलेल्या स्पर्धकांना यावेळी आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ मारडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव काळात तसेच वर्षभरात वाचन, लेखन, पाठांतर, वक्तृत्व, ग्रंथ सारांश लेखन, कथाकथन, धावणे, शस चालणे, खादाड स्पर्धा, संथगती सायकल स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन तसेच नियमित वाचक अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांतील सहभागी व विजेत्यांना प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. सर्व स्पर्धकांना बक्षिसे मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले.
प्रमुख पाहुणे रघुनाथ मारडकर यांनी आपल्या मनोगतात जीवनात स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना, “स्पर्धा ही काळाची गरज असून, स्पर्धेमुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते,” असे मत व्यक्त केले. वाचनाची सवय आणि स्पर्धात्मक उपक्रम यांचा संगम विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व उपस्थितांचा परिचय नीला पाटील यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष विजय सिदगोंडा पाटील यांच्या हस्ते श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. संस्थेच्या कार्याचा आढावा व भावी योजनांची माहिती संस्थेचे सचिव गुरुशांतप्पा बिराजदार यांनी उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल ऋषिकेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास गुरुशांतप्पा बिराजदार, विजय सि. पाटील, दीपक शहा, अशोक बगाडे काका, देशमुख सर, अभिषेक पाटील, विजय रा. पाटील यांच्यासह स्पर्धक, बाल वाचक, रसिक वाचक, नगरवासी, सभासदगण व संचालक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. आभार प्रदर्शन कार्यवाह विजय रा. पाटील यांनी केले.


0 Comments