Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापुरातील चार तालुक्यांतील जागांवरून नेत्यांमध्ये संघर्ष

 साेलापुरातील चार तालुक्यांतील जागांवरून नेत्यांमध्ये संघर्ष




 करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी तर सांगोल्यात शिवसेनेशी युतीची चर्चा!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्य तेथे युती करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पक्षांतर्गत जागांवरून दक्षिण - उत्तर सोलापूर व मंगळवेढा - पंढरपूर तालुक्यांतील जागांवरून नेत्यांत ताणाताणी वाढल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी तर सांगोल्यात शिवसेनेशी युतीची चर्चा सुरू आहे.

सोमवारी (ता. १९) पालकमंत्री गोरे यांनी दिवसभरात तालुकानिहाय नेत्यांच्या बैठका घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर शक्य तेथे युती करून लढणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र दरम्यान, झालेल्या बैठकांत दक्षिण व उत्तर सोलापुरातील जागांवरून आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने तर मंगळवेढा - पंढरपुरातील जागांवरून आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात ताणाताणी झाल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. या चारही तालुक्यांतील जागांबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार - सावंत, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे हे आमदार, राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक, संजयमामा शिंदे, राजेंद्र राऊत, यशवंत माने, शहाजी पाटील हे माजी आमदार यांच्यासह रणजितसिंह शिंदे, प्रा. रामदास झोळ आदींनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमताचा संकल्प

शक्य असेल त्या ठिकाणी मित्र पक्षासोबत महायुती करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष मित्र पक्षासोबत महायुती करण्यास तयार होता. मात्र काहींच्या अहंकारामुळे महायुती झाली नाही. त्या कारणाने एमआयएम सारखा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ज्या तालुक्यात शक्य आहे. त्या ठिकाणी मित्रपक्षासोबत महायुती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमताचा संकल्प केला आहे. अक्कलकोट तालुक्यात कोणाशीही युती होणार नाही. मात्र, करमाळ्यात राष्ट्रवादीशी युतीची चर्चा सुरू आहे. त्याबाबत मंगळवारी निर्णय होईल. नगरपालिका, महापालिका निवडणुकीतील यशानंतर अनेकजण भाजपसोबत येण्यास तयार आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

जमिनीवरचा नेता, ते १५ फूट खाली

दोन फूट मागे नाही तर ते १५ फूट खाली गेल्याचा टोला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला. खासदार शिंदे यांनी लिहिलेल्या जाहीर पत्राबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. मी जमिनीवरील नेता आहे, त्या दिल्लीत बसून सोलापूरचे राजकारण करतात, असेही त्यांनी म्हटले.

हत्तूरमधून अलगोंडा पाटील

दक्षिण सोलापूरमधील हत्तुर मतदारसंघातून काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य इंदुमती अलगोंडा पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या ठिकाणाहून भाजपकडून उज्ज्वला हविनाळे यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments