Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनी काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना अतिक्रमण नोटिसा

 उजनी काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना अतिक्रमण नोटिसा



भीमाउपसा कार्यालयात संघर्ष समितीचा धडक मोर्चा

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- उजनी जलाशयाच्या काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभाग, भिमानगर यांच्याकडून अतिक्रमण केल्याच्या नोटिसा मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती (करमाळा व इंदापूर तालुका) यांच्या वतीने भिमानगर (ता. माढा) येथील भीमा उपसा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. सुचिता डुबरे यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

संघर्ष समितीने सौ. डुबरे यांच्यासमोर उजनी धरणग्रस्तांनी देशहितासाठी केलेल्या त्यागाची माहिती मांडली. धरणग्रस्तांनी घरे, शेती, गावे व श्रद्धा पाण्याखाली देत नाममात्र मोबदल्यात जमिनी शासनाकडे सुपूर्द केल्या. त्यानंतर ४०–५० वर्षांनी कर्ज काढून शेतीला पाणीपुरवठा उभा केला आहे. शेकडो एकर जमिनी जलाशयासाठी दिल्यानंतर काठावर उरलेल्या मोजक्या जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. तत्कालीन सर्व्हेवेळी संपादित झालेल्या काही जमिनी प्रत्यक्षात पाण्याखाली जात नसून त्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्या जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. अशाच जमिनींवर अतिक्रमणाचा आरोप करून नोटिसा देण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला.

या सर्व बाबी लक्षात घेऊन सौ. डुबरे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे संघर्ष समितीने सांगितले.

या शिष्टमंडळात उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुक्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, नोटीस प्राप्त शेतकरी संघटनेचे नेते हनुमंत यादव, ढोकरीचे दत्ता टकले, तसेच इंदापूर तालुक्यातून माजी उपसभापती अंकुश आप्पा पाडुळे, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, काकासाहेब मांढरे आदींसह इतर शेतकरी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments