व्यंकटेश विद्यालयातर्फे संगीत महोत्सवाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील श्री. व्यंकटेश संगीत विद्यालयातर्फे संगीत समारोहाचे आयोजन शनिवार दि. ३ व रविवार दि.४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती संदीप कुलकर्णी व उमाकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवर्य श्री. दिगंबर बुवा कुलकर्णी व गुरुवर्य श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोलापूरातील श्री. सरस्वती मदिर प्रशाला (गणपती घाटाजवळ) सायंकाळी ६ वाजता हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाला मुंबई येथील निकिता दरेकर व तेजा काळे (पुणे) या आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकार येणार आहेत. या दोन्हीही कलाकारांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना तबला वादनाची साथ गणेश तानवडे (पुणे) व स्वराज कुलकर्णी (पुणे) व हार्मोनियमची साथ संतोष कुलकर्णी हे करणार आहेत. कोल्हापूर येथील सचिन कचोटे यांचे स्वतंत्र तबला वादन होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन सोलापूरातील निवेदिका अनिता बुरा करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमास सोलापूरातील संगीतप्रेमीनी उपस्थित राहुन संगीताचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन व्यंकटेश संगीत विद्यालयातर्फे करण्यात येत आहे.

0 Comments