महापौर पदासाठी आरक्षण सोडत 22 जानेवारीला
सोलापूरात महापौरपदी कुणाची लागणार वर्णी?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यामध्ये महापालिकेची निवडणूक पार पडली असून 29 पालिकांच्या निवडणूका झाल्या आहेत.
तब्बल 25 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, पुणे महापालिकेसह महत्त्वांच्या पालिकांमध्ये कोण धुरा सांभाळणार याकडे लक्ष लागले आहे. महापौर पदाबाबत आता नगरविकास विभागाने अधिकृत पत्र काढून तारीख जाहीर केली आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेगआला आहे.
राज्याच्या नगरविकास खात्याकडून महापौर पदाची सोडत जाहीर केली जाते. मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे महापौर आरक्षण सोडतीला उशीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार आहे. एकनाथ शिंदेंनी हिरवा कंदील दिल्यानंतर महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सध्या नगरविकास खात्याचे एक पत्र समोर आले आहे. शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी 19 जानेवारी रोजी नगर विकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार, येत्या 22 जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणासाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मा. राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.२२.०१.२०२६ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११.०० वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर बाब राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक पालिकांमध्ये महापौर बसवण्यासाठी एका पक्षाने बहुमत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांचे अंकाचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरु झाले आहे. मुंबई महापालिकेबाबत देखील हीच परिस्थिती आहे महायुतीचा मुंबईमध्ये महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा नेता महापौर बसवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यावरुन काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर महापौरपदी आता कुणाची लागणार याकडे लक्ष लागले आहे. निवडून आलेले आयाराम नगरसेवक की मूळ भाजपचे निवडून आलेल्या जुन्या कार्यकर्त्यांतून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
भाजपने यंदा महापलिका निवडणुकीत शत प्रतिशतचा नारा देत 102 पैकी 87 जागांवर विजय संपादन केले. त्यामुळे भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढली आहे. शहर उत्तर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून तिकीट देण्यात आले. यातील बहुतांश आयाराम नगरसेवक झाले. तिकीट वाटपात निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. नाराजीही व्यक्त करत आंदोलने केली. परंतु पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करत आयारामांना प्रवेश देत नगरसेवक केले. आता आयाराम नगरसेवकांची संख्या अधिक झाल्याने महापौर निवडीतही आयाराम नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापौरपदासाठी अद्यापही आरक्षण सोडत निघालेले नाही. डॉ. किरण देशमुख, शिवानंद पाटील, राजश्री कणके, संजय कोळी, विनायक विटकर, नरेंद्र काळे, अमर पुदाले हे भाजपाचे जुने नगरसेवक आहेत. रंजिता चाकोते, विनायक कोंड्याल, श्रीदेवी फुलारे यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महापौरपदी वर्णी कुणाची लागणार हे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच होणार आहे.
.png)
0 Comments