Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या प्रश्नांवर वैभव गंगणे यांचे बनसोडे यांना निवेदन

 सोलापूरच्या प्रश्नांवर वैभव गंगणे यांचे बनसोडे यांना निवेदन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन सोलापूरच्या तातडीच्या विकासप्रश्नांवर महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सोलापूरच्या आर्थिक विकासासाठी भरीव योजना राबवाव्यात

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सोलापूरचा आर्थिक विकास वेगाने होण्यासाठी शासनाच्या भरीव योजना तातडीने राबविणे आवश्यक असल्याचे गंगणे यांनी सांगितले.

पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि कल्याण या शहरांतून सोलापूरला पर्यटन वाढू शकते. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत एक्झिबिशन सेंटरचे आयोजन करून सोलापूरच्या व्यापाऱ्यांना मोठ्या शहरांत आपली उत्पादने सादर करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यामुळे हॉटेल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, प्रवास, दळणवळण, ट्रेड यांसह विविध क्षेत्रात १५ ते २० हजार नोकऱ्या व स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतात.

सोलापूरातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी आपल्या स्तरावर विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन वैभव गंगणे यांनी केले.

सोलापुरात मोठे रोजगार मेळावे भरवावेत

सोलापूरमध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे विविध नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्याने निमंत्रित करून मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावे आयोजित करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये खालील सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने येथे उद्योग वाढीस मोठी संधी आहे:

मनुष्यबळाची उपलब्धता, मुबलक पाणी व वीज, उद्योगांसाठी जमीन, नॅशनल हायवेचे जाळे,रेल्वे व विमानसेवा, उत्पादन क्षेत्रासाठी पोषक वातावरण, उत्पादन क्षेत्रातील टेक्सटाईल, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स, आयटी कंपन्या यांसारख्या उद्योगांसाठी सोलापूर हा योग्य शहर असल्याचे गंगणे यांनी नमूद केले.

स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यास मदत

या रोजगार मेळाव्यांमुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल, बेरोजगारी कमी होईल आणि सोलापूरची औद्योगिक प्रगती वेग घेईल, असा विश्वास गंगणे यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments