बनावट कफ सिरप प्रकरणी राज्य शासनाची तत्काळ कारवाई
अकलूज (कटूसत्य वृत्त):- बनावट कफ सिरपच्या वापरामुळे लहान मुलांचे बळी जाण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हा गंभीर विषय महाराष्ट्र विधानमंडळात उपस्थित केला. मध्यप्रदेश व राजस्थानमधील घटनांचा संदर्भ देत, महाराष्ट्रात शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये वापरण्यात आलेल्या औषधांची तपासणी झाली का,स्थानिक व परराज्यातून आलेल्या औषधांची गुणवत्ता तपासली का,लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपवर तातडीची बंदी घालण्यात आली का, तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्यांवर कोणती कारवाई झाली, असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
यावर आरोग्य मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले की मध्यप्रदेश मधील लहान मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या COLDIRF SYRUP B.N. १३ या कफ सिरपचा राज्यात वापर झाल्याचे निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. तपासणीत काही शासकीय आरोग्य संस्थांमध्ये औषध खरेदीत अनियमितता आढळली असून, बनावट व निकृष्ट औषधे पुरवठा करणाऱ्या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांविरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर कारवाई करून काहींचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ऑनलाइन औषध विक्रीवरही FDA मार्फत तपासणी सुरू असल्याचे शासनाने स्पष्ट केले.
मोहिते पाटील यांच्या सजगतेमुळे औषध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीतील त्रुटी, निरीक्षणातील कमतरता आणि नियामक समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला असून, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित औषधांमध्ये अधिक कडक गुणवत्ता नियंत्रण व जबाबदारी निश्चित करण्याची गरज स्पष्ट झाली आहे.संपूर्ण प्रकरणात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जनतेच्या जिवाशी संबंधित प्रश्नांवर दाखवलेली ठाम भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली असून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी निर्भीडपणे सभागृहात मांडून शासनाला अधिक जबाबदार व सतर्क बनवले आहे.
.jpg)
0 Comments