Hot Posts

6/recent/ticker-posts

करमाळा तालुक्यातील कुणबी दाखल्यांना अडथळे; सकल मराठा समाजाची तक्रार

 करमाळा तालुक्यातील कुणबी दाखल्यांना अडथळे; सकल मराठा समाजाची तक्रार




करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांचे कुणबी दाखले जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचा गंभीर आरोप कुर्डुवाडी येथील प्रांत अधिकारी कार्यालयावर करण्यात आला आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सचिन काळे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदन सादर केले असून, या निवेदनावर समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, कुर्डुवाडी प्रांत कार्यालयाकडून कुणबी दाखल्यांची प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहेत. अर्जदारांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्वतः सही केलेली असताना “सेल्फ अटेस्टेड”चा अनावश्यक आग्रह धरून अडवणूक केली जात आहे. तसेच, घरातील एका व्यक्तीच्या प्रकरणासाठी तहसीलदारांनी प्रमाणित केलेली कागदपत्रे ग्राह्य धरली जात असताना, त्याच कुटुंबातील दुसऱ्या प्रकरणासाठी मूळ कागदपत्रांची मागणी करून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, कुटुंबात जुनी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध असतानाही संबंधित प्रकरणांना बाजूला ठेवण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जुनी वैधता प्रमाणपत्रे व महसुली पुरावे असूनही त्यांना महत्व न देता अनावश्यक फेरफाराची मागणी करून प्रकरणे अडवली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच, करमाळा तहसील कार्यालयातून कुर्डुवाडी प्रांत कार्यालयाकडे आवक-जावक पद्धतीने गेलेली प्रकरणे त्रुटी दाखवून परत पाठविली जात असतील, तर ती प्रकरणे पुन्हा सादर करताना तहसीलदारांची सही घेऊन करमाळा तहसील कार्यालयातच ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात, अन्यथा सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने कुर्डुवाडी प्रांत अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात येईल. तसेच १ जानेवारी २०२६ रोजी नववर्षाच्या स्वागताऐवजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व कुर्डुवाडी प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर सचिन काळे, पांडुरंग साळुंखे, माऊली पवार, दादासाहेब तनपुरे व दीपक गायकवाड यांच्यासह सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments