Hot Posts

6/recent/ticker-posts

एमआयटी गुरुकुल स्कूलचा ‘व्हिजिएस तरंग २०२५’ उत्साहात संपन्न

  एमआयटी गुरुकुल स्कूलचा ‘व्हिजिएस तरंग २०२५’ उत्साहात संपन्न




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  “समाजामध्ये जे घडत आहे ते पाहता आजच्या घडीला मुलांना सुसंस्कृत करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. रील हिरो आणि रियल हिरो यातला भेद करता येण हे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या रियल हिरोंची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात होणे आवश्यक आहे.” असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिजिएस तरंग २०२५’ या तीन दिवसीय आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून ते बोलत होते. आपल्या जीवनप्रवासाविषयी बोलताना आलेले अनुभव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांसामोर मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले “आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे कारण तीच आपली खरी ओळख आहे. देशप्रेम केवळ घोषणेत असण्यापेक्षा ते कृतीत असणे अधिक महत्वाचे आहे आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव असणे गरजेचे आहे.” 
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला दृष्टिहीन टी-२० क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम, माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे, राघवेंद्र चाटे संचालक स्ट्रॅटजी अँड ऑपरेशन्स, शाळेच्या शैक्षणिक प्रमुख शीतल वर्मा, मार्केटिंग व ऑपरेशन्स प्रमुख प्रा. के.सी. मिश्रा, पंढरपूर कॅम्पसचे सहसंचालक प्रशासन कर्नल डी. के. उपाध्याय, मुख्याध्यापक शिवाजी गवळी, प्राचार्य डॉ. स्वप्निल सेठ यांच्यासह एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लोणी काळभोर, कोथरूड, छत्रपती संभाजीनगर, सांगली तसेच नवी मुंबईतील उळवे या आठही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गायन, नृत्य, वादविवाद, अभिनय यांसारख्या सांस्कृतिक कलाविष्कारांसोबतच धावणे, जलतरण, थाळी फेक, गोळा फेक, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. अंतिम सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी नुकत्याच श्रीलंका येथे पार पडलेल्या दृष्टिहीन महिलांच्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलताना विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतेही आव्हान पेलता येते असा संदेश दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या “भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणपद्धतीचा संगम साधत एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर मूल्याधारित शिक्षणावर भर देत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याची शिकवण विद्यार्थ्यांमध्ये एमआयटी रुजवत आहे. आमचे ध्येय केवळ ज्ञानदान नसून, सामाजिक जबाबदारीची जाण असलेले सुजाण आणि संवेनदनशील नागरिक घडवणे आहे.” असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर विविध स्पर्धेतील  विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजिता चौकेकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments