लोकमंगल कृषी महाविद्यालयात जीवन मूल्यांविषयी मार्गदर्शन संपन्न
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक २५ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जनजागृती साठी आणि जीवनमूल्य रुजविण्याकरिता मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकमंगल फाउंडेशनचे संचालक श्री.मारुती तोडकर हे लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी प्रास्ताविकाद्वारे लोकमंगल फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री मारुती तोडकर यांची ओळख उपस्थितांना करून देऊन, महाविद्यालयाच्या कृषी विस्तार विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वर्षाराणी दावणे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. मारुती तोडकर यांनी लोकमंगल फाउंडेशन आणि कार्यप्रणाली याबाबत जागृत केले. विद्यार्थी म्हणून सामाजिक आयुष्यातल्या अत्यावश्यक असणाऱ्या जीवनमूल्यांविषयी त्यांनी प्रबोधनपर मत मांडले. याप्रसंगी त्यांनी लोकमंगल फाउंडेशन तर्फे विविध सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, धार्मिक,अध्यात्मिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल माहिती दिली.
सध्याच्या धावत्या युगामध्ये लोप पावत चाललेला संवाद आणि कौटुंबिक स्थिती आणि त्याचे होणारे दीर्घ असे गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी समाजामध्ये वावरत असताना सर्वांनी सामाजिक भान राखणे काळाची गरज आहे ,असे प्रतिपादन केले. अंतिम वर्षातील रावे मधील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील शाळांमध्ये लोकमंगल समूहाच्या उल्लेखनीय अशा अन्नपूर्णा योजनेकरिता एक मूठ धान्य आजी आजोबांसाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाच्या कृषि विस्तार विभाग प्रमुखा डॉ.दावणे व्ही. टी., राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे व महाविद्यालयातील विद्यार्थी , विद्यार्थिनी यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला. व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित कुरे यांनी केले.

0 Comments