टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे आदर्श उपक्रम- सुरजा बोबडे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत टेंभुर्णी ग्रामपंचायतीने विविध लोककल्याणकारी, पर्यावरणपूरक व विकासाभिमुख उपक्रम राबवून आदर्श ग्रामपंचायतीचा नमुना निर्माण केला आहे यासंदर्भात टेंभुर्णी सरपंच सुरजाताई बोबडे यांनी सदर अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
ग्रामपंचायतीकडून नागरिकांना विविध करांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत असून पारदर्शी कारभारावर भर देण्यात आला आहे. नागरिकांनी ‘मेरी पंचायत’ ॲप्लिकेशन डाउनलोड करून ग्रामपंचायतीच्या कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाई असे महिला गट स्थापन करण्यात आले आहेत. महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण, उद्योग–व्यवसायासाठी कर्ज सुविधा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन, तसेच महिला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
गावातील पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी नळांना तोटी बसविण्यात आल्या असून स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यापूर्वी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून आता महाश्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी ५ हजार शेतकऱ्यांना आंबा व चिकूची झाडे देण्यात आली आहेत. ‘झाडे लावा’ अभियान, प्लास्टिकमुक्त टेंभुर्णी, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, तसेच सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते वृक्ष लागवडीसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टेंभुर्णी येथे तीन ठिकाणी कापडी पिशवी बनविण्याची मशीन बसविण्यात येणार आहेत.
शैक्षणिक सुविधांमध्ये सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवण्यात आले असून शाळांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. लवकरच वाचनालय व अभ्यासिका सुरू होणार आहेत. गावाच्या सौंदर्यीकरणासाठी गार्डन, बगीचा व नाना नाणी पार्क उभारण्यात येत आहे.
टेंभुर्णी गावाचे नाव टेंभुर्णी झाडावरून पडल्याची ऐतिहासिक माहिती मुंबई गॅझेटमधून संकलित करून तिचे जतन करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत १५३ दिव्यांगांना लाभ देण्यात आला आहे. येत्या काळात सुमारे ६० विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.
सदर कार्यक्रमास सरपंच सुरजाताई बोबडे, उपसरपंच राजश्री नेवासे, ग्रामसेवक संजय साळुंखे, भाजप अध्यक्ष योगेश बोबडे, नागनाथ वाघे (गसदस्य), जयवंत पोळ (माजी सदस्य), सतीश नेवासे (प्रतिनिधी) गौतम कांबळे (सदस्य), तुकाराम डोके (सदस्य), दादा पाटील (सदस्य), कृषी अधिकारी राहुल मोरे यांच्यासह टेंभुर्णी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज वजाळे यांनी प्रभावीपणे केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे हे सर्व उपक्रम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहेत अशी सर्व सर्वत्र होत आहे.
.png)
0 Comments