Hot Posts

6/recent/ticker-posts

"माझ्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे", मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

 "माझ्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे", मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप





- धनंजय मुंडेंचा धंदाच तो"; नार्को टेस्ट आणि मोबाईल तपासणीची मागणी- करुणा शर्मा

- मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेची चौकशी करावी


अंतरवाली सराटी (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जरांगे पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप केला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. कारण आरोपींसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी खून करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नेत्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानाने ऐकली आहे. त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे पाटील सांगत होते ते खरे आहे का? मला ही गोष्ट कळाली. त्यानंतर याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली. कारण मुख्य सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सरकारने संरक्षण देणे गरजेचे आहे.”

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना जरागे-पाटील पुढे म्हणाले की, “मराठा समाजाने शांत रहावे. माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे.”

गेल्या तीन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे. या दरम्यान त्यांचे सरकार आणि ओबीसी नेत्यांशी मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला आहे.

याचदरम्यान जरांगे-पाटील आणि या ओबीसी नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दीक चकमक होते. अशातच अलिकडे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता जरांगे-पाटील यांच्या हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आले आहे.

माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाहीये. त्याने जी घटना करायला नको होती, ती त्याने केली आहे. हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली आहे.

राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही", असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. मी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही प्रत्युत्तर जरांगेंनी मुंडेंना दिले आहे.

मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची अडीच कोटी रुपयांमध्ये सुपारी दिली, असे जरांगे म्हणाले. त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला. तो धनंजय मुंडेंचा पीए असल्याचेही जरांगे म्हणाले.

त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. थोतांड बंद करा म्हणत त्यांनी मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी द्या, अशी मागणी केली.

धन्या, मी तुझ्यासारखा नाहीये, मी जातवाण - मनोज जरांगे

धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. "मला माहिती मिळाली होती. ती मी पोलिसांना दिली. घातपाताच्या प्रकरणात आठ ते दहा जण आहेत. त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्या प्रकरणाची चौकशी व्हायला नको का?", असे जरांगे म्हणाले.

"धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायची म्हणत असतील, तर मी नार्को टेस्ट करून घ्यायला तयार आहे. उद्या मी गृह मंत्रालयात, न्यायालयात, पोलीस अधीक्षक कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार. धन्या मी तुझ्यासारखा नाहीये. मी जातवाण आहे. मी असे खुनाचे, घातपाताचे आरोप करू शकत नाही. नार्को टेस्टला सगळ्यात आधी जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो?, अशी टीका जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे.

जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप

"दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहेत, असे म्हणायचे. धन्या तू आता पक्का अडकला आहे", असे जरांगे म्हणाले. ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंनी सांगितले की, "या क्लिपमधील २ आरोपी आहेत. तुम्ही पैशांसाठी मूळावर उठतात का? समाज इतका कमजोर झाला असे तुम्हाला दाखवायचे आहे का? मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे", अशी टीका जरांगे पाटलांनी केली.

या प्रकरणावर करुणा शर्मा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, जरांगे भाऊंनी जे सांगितले की त्यांच्याविरुद्ध कट रचला गेला आहे, ते खरे आहे. धनंजय मुंडे यांचा धंदाच तो आहे. जे त्यांच्या विरोधात जातात, त्यांच्या विरोधात ते कटकारस्थान रचतात. जरांगे पाटील यांच्या लोकांना फोडण्यात आले आणि मला याची माहिती एक महिना आधीच होती. दादा गरड माझ्या घरी तीन वेळा आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल तपासावा, कारण त्यात धनंजय मुंडे आणि त्यांची रेकॉर्डिंग आहे, असे त्यांनी सांगितले.

करुणा शर्मा पुढे म्हणाल्या की, माझी देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. पाच लाख रुपये आणि गाडीची बाब या प्रकरणात आहे. दोन नोव्हेंबर रोजी तो माझ्याकडे आला आणि मला पैसे मागितले. मी न्याय मागण्यासाठी जरांगे यांच्याकडे गेले होते. कराड याने मला बेदम मारहाण केली होती, त्याचे CCTV फुटेज आहे. त्याने आपल्या पत्नीला मारले आहे, तो आणखी काय करू शकत नाही? मी मुंडे घराण्याची सून आहे. त्यांनी माझ्यासोबत जे केले त्यामुळे माझी आणि त्यांच्या दोघांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर ते दाखवेन. माझ्या मागे कोणी नाही, पण मला न्याय पाहिजे. दादा गरड याची रेकॉर्डिंग मी स्वतः ऐकली आहे. त्याने मला पाच वेळा फोन केला आणि घरी आला होता, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments