तपोवनातील झाडांची कत्तल...ही साक्षात ईश्वरालाच इजा पोहोचवणे होय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुंभमेळा तोंडावर आलेला आहे. त्यासाठी राज्य सरकार पुरेपूर प्रयत्नही करत आहे आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून तपोवन येथे असणारे तब्बल 1800 झाड सरकार तोडणार असल्याची बातमी मध्यंतरी वाचनात आली आणि मनाला वेदना झाल्या. ज्या नाशिक शहराला प्रभू श्रीरामाची परंपरा आहे, त्याच नाशिक शहरामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे हे मनाला क्लेश देणारे आहे. प्रभू श्रीराम तब्बल 14 वर्षे वनवासात राहिल्याचं सर्व जगाला माहिती आहे. परंतु त्याकाळी सुद्धा धार्मिक कार्यक्रमासाठी वृक्षतोड झाल्याचे वाचनात आले नाही. (अर्थात तेव्हा वृक्ष वन आणि जंगल मुबलक प्रमाणात होती.)
वारकरी संप्रदायाची विचारधारा म्हणजे वारकऱ्यांसाठी हे अवघे विश्व ब्रह्मच आहे. चराचरामध्ये ईश्वराचे अस्तित्व आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, झाडेझुडे जीव पाषाण सोयरे. झाडे असोत, झुडुप असोत, कोणताही जीव असो अहो एवढंच काय एखादा पाषाण सुद्धा आम्हा वारकऱ्यांसाठी आमचा जिवाचा जिवलग असणारा सोयरा आहे. भंडाऱ्या डोंगरावर चिंतनासाठी गेल्यानंतर याच वृक्षांच्या, वेलींच्या, झाडांच्या सानिध्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चिंतनाला आणि अभंग लेखनाला बहर आला. म्हणूनच ते म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... वारकरी तत्त्वज्ञानाचा भाग म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ' विश्व ब्रम्हची केले ' असं आपण त्यांच्या आरतीमध्ये दररोज म्हणत असतो. आणि चराचरामध्ये ईश्वर असल्यामुळेच ज्ञानेश्वर महाराजांनी जड असणाऱ्या अशा भिंतीला सुद्धा चैतन्याने भरून टाकले. मग ज्यांच्या मध्ये प्राण आहेत त्या झाडांमध्ये सुद्धा ईश्वराचेच अस्तित्व आहे ना? अशी जिवंत झाडे तोडणे म्हणजे प्रत्यक्ष त्या ईश्वराला इजा करणे होय. म्हणूनच कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा विकासाच्या नावाखाली वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल थांबवलीच पाहिजे. हा प्रश्न एखाद्या राजकीय पक्षाचा नसून हा प्रश्न अखिल मानव जातीचा, हा प्रश्न पृथ्वीच्या अस्तित्वाचा आहे. तेव्हा सर्वांनीच अशा निर्णयाचा विरोध करायला हवा. कारण हे संपूर्ण विश्व संपूर्ण जग हे विष्णुमय आहे असे मानणारे आम्ही वारकरी आहोत.
@ हभप डॉ बालाजी महाराज जाधव
संस्थापक गाथा: चिंतन ट्रस्ट
मो l. 9422528290
0 Comments