जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनासाठी रणरागिणी रवाना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महाअधिवेशनासाठी सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य ताफा आज उत्साहात रवाना झाला. २३ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातून मोठ्या संख्येने रणरागिणी सहभागी होत आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके व प्रसिद्ध उद्योजिका मीना बासरी यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार असून उद्घाटन सत्राला अनेक मान्यवर सज्ज आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहकरे, चंद्रशेखर शिखरे, प्रदेश महासचिव स्नेहाताई खेडेकर, सीमा अडवाले, शुभांगी धोटे, किरण दरेकर, अर्चना भोंगळे, वेदांती देवतळे, नलू चाफले, स्नेहल गायकवाड, डॉ. दीपशिखा राजूरकर, दीपक खामकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या दोन दिवसांत महिलांच्या नेतृत्वविकासापासून सामाजिक भान, संघटन बळकटीकरण, आरक्षण प्रश्न, स्वावलंबन, आरोग्य आणि कायदे-जागरूकता अशा विविध विषयांवर एकूण सात प्रबोधन सत्रे आयोजित केली आहेत. तज्ज्ञ मान्यवर या सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दोनशे महिला पदाधिकारी अधिवेशनासाठी सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून महिलांचे गट घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात रवाना झाले.
राज्यभरातील महिलांना एकत्र आणणारे आणि सामाजिक–संघटनात्मक भान दृढ करणारे हे महाअधिवेशन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यात नवा उर्जावान अध्याय ठरेल, असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

0 Comments