Hot Posts

6/recent/ticker-posts

गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही - खा.मोहिते पाटील

 गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही - खा.मोहिते पाटील

अकलूज(कटूसत्य वृत्त):-मोहिते-पाटलांवर टीका करा, काय बोलायचे ते बोला पण गावकऱ्यांना आणि गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही, असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला.

शुक्रवारी, अकलूज नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पाटील वाड्यात करण्यात आला. यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी जयसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर, किशोरसिंह माने-पाटील, शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे, सतीशराव माने-देशमुख, नामदेव वाघमारे, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, स्वप्निल वाघमारे, रवी पाटील त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार मोहिते-पाटील राम सातपुते यांना उद्देशून म्हणाले, हजारो लोकांच्या दवाखान्याचा खर्च मोहिते-पाटील यांनी स्वतः केला आहे. पण आम्ही कधी त्याचे प्रसिध्दीकरण केले नाही. तुम्ही तर त्याचा बाजार मांडलाय. जर आमचा कोणाला त्रास असता तर अकलूज मेडिकल हब म्हणून नावारुपाला आले नसते. येथील बाजारपेठ फुलली नसती. येथील शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला आले नसते. ग्रामपंचायत स्तरावर आकाशवाणी केंद्र विजयदादांनी आणले. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात पहिले ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल जयसिंह मोहिते पाटील यांनी बांधला. ग्रामपंचायत स्तरावर पहिले आरटीओ

कार्यालय अकलूजला सुरु झाले. महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा अकलूजला सुरु झाली. पहिली डिजिटल ग्रामपंचायत अकलूज झाली. बहुजन समाजाला गाळे बांधून व्यवसाय करण्याची संधी दिली. विकास कसा करायचा ते आमच्याकडून शिका. दुष्काळी भागातून येणार आणि अकलूजच्या विकासावर शिंतोडे उडवणार हे खपवून घेतले जाणार नाही.

आमदार जानकर म्हणाले, तुमच्या पक्षाने सुरु केलेल्या सरकारी दहशतीला घाबरणारे आम्ही नाहीत. मतदानाच्या अगोदर मी स्वतः ईव्हीएम मशीन तपासणार आहे. दोन नंबर धंदेवाल्यांना गाडीत घेऊन तुम्ही फिरणार आणि आमची दहशत आहे म्हणून ओरडून सांगणार. सरकारी अधिकाऱ्यांना हप्त्यासाठी त्रास तुम्ही देणार आणि वरून आमची दहशत आहे, अशा उलट्या बोंबा मारणार हे अकलूजकरांना कळत नाही काय? आमची एवढी दहशत असती तर तुम्ही अकलूजला आलाच नसता, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी शिवतेजसिंह मोहिते-पाटील आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूजच्या विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडून मतदान करण्याचे आवाहन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments