प्रभाग 20 च्या मतदार यादीत मोठा घोळ
शेजारच्या चार प्रभागांचे हजारो मतदार 20 मध्ये; इच्छुक उमेदवारांमध्ये खळबळ
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असतानाच प्रभाग क्रमांक 20 च्या मतदारयादीत प्रचंड गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. महापालिकेने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार प्रभाग 20 ची लोकसंख्या 45,581 दाखवण्यात आली असून, यात पुरुष 22,667 आणि स्त्रिया 22,895 इतकी नोंद केली आहे. तथापि, ही संख्या वास्तव परिस्थितीपेक्षा मोठ्या प्रमाणात तफावत दाखवत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक व इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आला आहे.
शेजारील प्रभागांचे 5–6 हजार मतदार ‘उचलून’ प्रभाग 20 मध्ये?
प्रभाग 20 च्या मतदारयादीचे बारकाईने निरीक्षण केले असता, प्रभाग 19, 21, 22 आणि 25 मधील जवळपास 5 ते 6 हजार मतदार प्रभाग 20 मध्ये ‘चुकून’ हलवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे संबंधित मतदारांसह आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळ, नाराजी आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदारयादीतील या मोठ्या त्रुटींवर तौफिक पैलवान शेख, नुरोदिन मुल्ला, इरफान शेख, अबूबकर सय्यद यांनी अधिकृत आक्षेप नोंदवला आहे.
याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करून यादीतील गंभीर विसंगतींची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
महानगरपालिकेने मतदारयादी जाहीर करण्यास सुरुवात केली असली, तरी अनेक प्रभागांमध्ये मतदार ‘इधर-उधर’ झाल्याने: मतदार स्वतःच्या नावाबाबत संभ्रमात, निवडणुकांसाठी रणनीती आखणारे इच्छुक उमेदवार अचंबित तर सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
प्रभाग 20 ला शहरभरात विशेष राजकीय महत्व असल्याने या गोंधळाचे परिणाम आगामी निवडणुकीवर थेट दिसून येणार, असे स्थानिक पातळीवर सांगितले जात आहे.
तक्रारदारांनी मतदारयादीतील त्रुटींची तातडीने तपासणी करून दुरुस्ती न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा याबाबतचा पुढील निर्णय आता सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

0 Comments