बारसकरासह संपूर्ण शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी होम-टू-होम प्रचारात घेतली आघाडी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतर मोहोळ शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून मोहोळ नगरपरिषदेवर वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपसमोर शिवसेना शिंदे गटाने भक्कम आणि सुसंघटित लढत उभारल्याने या निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या राजकीय लढतीचा केंद्रबिंदू ठरले आहेत, मोहोळचे शिवसेना नेते, पॅनल प्रमुख व माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर.
अडीच वर्षांच्या अल्प कार्यकाळातही कठीण परिस्थितीतून मोहोळ शहराला दर्जेदार विकासाची नवी दिशा देणारे रमेश बारसकर यांनी पुन्हा एकदा मोहोळकरांच्या अपेक्षांचे अधिष्ठान बनले आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या मुख्य रस्त्यासह इतर विकासकामांचा प्रभाव आजही शहर अनुभवत आहे. बारसकरांची विकासाची परंपरा, मोहोळकरांच्या मनातील आशेचा किरण. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या पॅनलच्या प्रचाराचा मोठा शुभारंभ नुकताच मोहोळमध्ये पार पडला. या सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष उपस्थित होते आणि त्यांच्या सभेतील उपस्थितीने संपूर्ण मोहोळमध्ये ऊर्जा, उत्साह आणि विजयी लाटेचे संकेत निर्माण झाले.
सभेत बोलताना शिंदे यांनी मोहोळकरांना ठाम आश्वासन दिले, “मोहोळ शहराचा विकास कोणत्याही परिस्थितीत मागे राहू देणार नाही. निधी, योजना आणि शासकीय मदतीची कमतरता कधीच भासणार नाही. संपूर्ण शिंदे गट मोहोळच्या पाठीशी आहे.” “मोहोळचा विकास रोखणार नाही.” त्यांच्या या शब्दांनी गेल्या 30 वर्षांत राजकीय अडथळ्यांमुळे रखडलेल्या विकासाला आता गती मिळणार, असा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला.
रमेश बारसकर यांनी सभेत प्रस्थापित नेतृत्वावर थेट आरोपांचा मारा केला. ते म्हणाले, “आजपर्यंत प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून मोहोळच्या मुख्य रस्त्यासाठी एक रुपयाही मिळू दिला नाही. विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे आणले. पण जनता सर्व पाहत आहे.” त्यांच्या या आरोपांना नागरिकांनीही जोरदार दाद दिली. कारण बारसकरांच्या कार्यकाळातील प्रत्यक्ष कामांची साक्ष मोहोळ आजही देते. हे वास्तव नागरिकांमध्ये ठाममताने व्यक्त झाले.
शिंदे गटाच्या उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधणारी होम-टू-होम मोहीम सुरू केली असून प्रत्येक प्रभागात या मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बारसकर स्वतः या मोहिमेत आघाडीवर असून जाहीरनाम्याची माहिती, विकासाचा आराखडा व भविष्यातील दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न नागरिकांना भावतो आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे चिन्ह मोहोळकरांच्या मनात स्थिरावताना दिसत आहे.
राजकीय समीकरणे, नागरिकांचा प्रतिसाद, निधीची आश्वासने आणि पॅनलप्रमुख म्हणून बारसकरांचा विकासाचा ट्रॅकरेकॉर्ड पाहता मोहोळमधील वातावरण शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने झुकले असल्याची चर्चा जोमात आहे. मोहोळमध्ये एकच चर्चा : “नगरपरिषद भगव्या झेंड्याकडे.”
सर्व प्रभागांतून शिंदे गटाचे उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते आहे. धनुष्यबाणाचे चिन्ह शहरभर लोकप्रिय झाल्याने शिवसेनेच्या पॅनलाला परिवर्तनाच्या नव्या पहाटेची चाहूल लागली आहे.
मोहोळमधील बदलत्या राजकीय वाऱ्यांमुळे आगामी नगरपरिषद निवडणूक ही केवळ सत्ता हस्तांतरणाची नव्हे, तर शहराच्या संपूर्ण विकासपर्वाची सुरुवात ठरणार असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थन, बारसकरांचे नेतृत्व आणि नागरिकांची उभारी या तिन्हींच्या संगमामुळे मोहोळ शहरात परिवर्तनाची नवी पहाट उगवण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
0 Comments