Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी आमदार (स्व) गणपतराव देशमुखांच्या घरावर हल्ला

 माजी आमदार (स्व) गणपतराव देशमुखांच्या घरावर हल्ला



 


आज सांगोला बंदची हाक


सांगोला (कटूसत्य वृत्त):- शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार (स्व.) भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर  ता. १० ऑक्टोबर रोजी अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे सांगोल्यात एकच खळबळ उडाली असून शेतकरी कामगार पक्षाने या हल्याच्या निषेधार्थ आज (ता. ११ ऑक्टोबर) 'सांगोला बंद'ची हाक दिली आहे.

सांगोल्यात शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. त्या प्रवेशापूर्वी अज्ञातांनी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर बाटली फेकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गणपतआबांच्या घरी सध्या त्यांचे नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख राहत आहेत. एकीकडे सांगोला शहरात भाजप पक्षप्रवेश होणार होता, त्या वेळीच सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपराव देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे. हा हल्ला का करण्यात आला. त्यामागे कोण आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, सांगोला शहरात (स्व.) गणपराव देशमुख यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे व सांगोला पोलिस ठाण्याचे काशीद यांना निवेदन देण्यात आले आहे. या हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, गणपराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याचा सांगोला शहर व तालुक्यातील जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून आज शनिवारी सांगोला बंदची हाक देण्यात आलेली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments