Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल शैक्षणिक संकुलात पालक मेळावा उत्साहात संपन्न

 लोकमंगल शैक्षणिक संकुलात पालक मेळावा उत्साहात संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कॉलेजेस वडाळा येथे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून व सोलापूर सोशल फाउंडेशन पुरस्कृत सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह निमित्त दिनांक ३ ऑक्टोबर  रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून सबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन सप्ताह २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. याच धर्तीवर आयोजित पालक मेळाव्यास अध्यक्ष म्हणून लोकमंगल शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. आ. सुभाष देशमुख हे लाभले होते. सुप्रसिद्ध वक्ते व सोलापूर जिल्ह्याचे साहित्य वैभव असणारे. शिवाजीराव पवार हे प्रमुख अतिथी म्हणून मेळाव्यास उपस्थित होते. सदरील पालक मेळावा हा प्रामुख्याने महिला पालकांच्या महाविद्यालय भेटीसाठी विशेष आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष  सुभाष देशमुख, प्रमुख अतिथी, संस्थेच्या सचिव डॉ.अनिता ढोबळे, लोकमंगल शैक्षणिक संकुलातील  सर्व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींचा सन्मान माननीय अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी लोकमंगल उडान शिष्यवृत्ती बाबत उपस्थितांना जागृत केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकमंगल शैक्षणिक संकुलातील लोकमंगल उडान शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान याप्रसंगी पालकांसमवेत करण्यात आला. यात विज्ञान उद्योजकता महाविद्यालयामधून पैलवान अंबादास, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून उन्हाळे सोनाली, मैथिली कोळी, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातून गौरीशंकर हल्लोळी, रोहन काडगी, अपर्णा चौगुले, आलिया मुल्ला, वैभवी  वाघमोडे आणि कृषी महाविद्यालयामधून स्वप्नाली खराटमोल, वैष्णवी पाटील, वैष्णवी जाधव आणि मृगेंद्र घागरे या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश होता. सदरील पालक मेळाव्यास महिला पालक वर्गांची उल्लेखनीय उपस्थिती होती. याच अनुषंगाने  लोकमंगल औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापिका ज्योत्सना अंभोरे यांनी स्वकर्तुत्वातून घेतलेल्या भरारीची प्रेरणादायी यशोगाथा सर्वांसमोर मांडून विशेष दाद मिळवली. ग्रामीण भागातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधी ह्याच जीवनाचा खरा सार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित पालक वर्गाला संबोधित करताना संस्थेच्या सचिव डॉ. अनिता ढोबळे यांनी लोकमंगल शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या विविध बाबींवर प्रकाश टाकला. पाल्याच्या जडणघडणीत पालकांनी देखील महाविद्यालयात वेळोवेळी भेटी देऊन प्रगती जाणून घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री. शिवाजीराव पवार  यांनी खुमासदार शैलीमध्ये मार्मिक उदाहरणासह पालक व विद्यार्थ्यांची वास्तवाशी ओळख करून दिली. विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल हे वेळीच टिपणे आणि त्यानुसार मार्गदर्शन मिळणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पालक मेळाव्याचे आयोजन नियमित स्वरूपात करणे काळाची गरज असल्याची त्यांनी नमुद केले. पालकांच्या कष्टाच्या जाणिवेवर विद्यार्थ्याचे भवितव्य अवलंबून असून तेच यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमंगल शैक्षणिक संकुलातील माळरानावर बहरलेले नंदनवन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात नक्कीच भर घालत असल्याचे कौतुक उदगार त्यांनी काढले. यानंतर लोकमंगल कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांनी उडान शिष्यवृत्तीची उपयोगिता याबाबतच्या  नाविन्यपूर्ण गोष्टी पालकांना ज्ञात करून दिल्या. अध्यक्षीय मनोगता मध्ये  सुभाष देशमुख यांनी महिलाभगिनी आधारित पालक मेळावा संकल्पना व तिचे महत्त्व हे अधोरेखित केले. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पालक गुरुजन वर्ग या दोघांचाही वाटा असून अशा मेळाव्याच्या आयोजनातून देवाण-घेवाण होते आणि पाल्याचा उत्कर्ष होण्यासाठी हे महत्वपूर्ण असून हाच मेळाव्याचा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमंगल शैक्षणिक संकुल उडान शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तसेच  सामाजिक उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची त्यांनी ग्वाही दिली. सध्याच्या पूरजन्य परिस्थितीत शेतकरी वर्गाने खचून न जाता नव्याने भरारी घेण्याची इच्छाशक्ती बाळगावी आणि त्याकरिता लोकमंगल समूह सर्वोत्परी सहकार्य करेल हा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. उडान शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे मनस्वी कौतुक व्यक्त करून आगामी काळात उडान शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या अशीच वाढत राहावी ही सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचा शेवट हा लोकमंगल कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सागर महाजन यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. औपचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समीक्षा तोडकरी आणि कु. अर्पिता विजापुरे यांनी केले. औपचारिक कार्यक्रमानंतर सर्व पालकांच्या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रक्षेत्र भेटीनंतर सर्व पालकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. मेळाव्याच्या उत्तरार्धात पालकांनी संलग्नित महाविद्यालयांना भेटी देऊन आपल्या पाल्याची प्रगती जाणून घेतली.  सदरील मेळाव्यास महिला पालक वर्गांची उल्लेखनीय उपस्थिती होती. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लोकमंगल शैक्षणिक संकुलातील सर्व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. 
Reactions

Post a Comment

0 Comments