पंचायत समिती सभापतिपद आरक्षण जाहीर
माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूरचे सभापतिपद खुले; महिलांना सहा ठिकाणी संधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के म्हणजेच सहा पंचायत समित्यांचे सभापतिपद आरक्षित झाले आहे. जिल्ह्यातील केवळ माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर पंचायत समित्यांचे सभापतीपद खुले असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक चुरस असणार आहे. याशिवाय कुणबी मराठा प्रमाणपत्रामुळे ओबीसींच्या जागेवर स्पर्धा दिसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण यापूर्वी जाहीर झाले आहे. त्या ठिकाणी निराशा झालेल्या इच्छुकांचे लक्ष पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या आरक्षणाकडे लागले होते.
सोलापूरच्या नियोजन भवनात जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण काढण्यात आले, त्यानुसार जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांचे सभापतिपद हे खुले (सर्वसाधारण प्रवर्ग) असणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तीन पंचायत समित्यांचे सभातिपद आरक्षित असणार आहे. तीन पंचायत समित्यांवर ओबीसींना, तर दोन ठिकाण अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी मिळणार आहे.
सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांचे गणाच्या आरक्षणाचे सर्वांचे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांपाठोपाठ आता पंचायत समित्यांच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. तसेच, राजकीय पक्षांकडूनही तयारीला सुरूवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
0 Comments