माध्यमभूषण"ने माध्यमांचे अंतरंग समजण्यास मदत होईल- रवींद्र गोळे
मुंबई (कटूसत्य वृत्त):- "माध्यमभूषण" या पुस्तकात पत्रकार,संपादक, आकाशवाणी, दूरदर्शनचे निर्माते, कॅमेरामन,संकलक, रंगभूषाकार, चित्रपट जगतातील पटकथा लेखक, दिग्दर्शक,तंत्रज्ञ, जाहिरात, जनसंपर्क, प्रकाशन अशा विविध माध्यमातील व्यक्तींच्या जीवन कथा उलगडल्याने, त्या त्या माध्यमांचे अंतरंग समजून घेणे वाचकांना नक्कीच आवडेल,असा विश्वास विवेक चे संपादक रवींद्र गोळे यांनी व्यक्त केला. रवींद्र गोळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते माध्यमभूषण पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत नुकतेच करण्यात आले,त्या प्रसंगी ते बोलत होते.
गोळे पुढे म्हणाले की, विविध माध्यमांमधून विविध सेलिब्रिटी,विविध घटना,प्रसंग, कथा नेहमीच आपल्यासमोर येत असतात. पण हे सर्व आपल्यासमोर सादर करणाऱ्या व्यक्ती नेहमीच पडद्याआड राहून ,आपली भूमिका बजावत असतात. या पुस्तकामुळे अशा सर्व व्यक्तींचे योगदान किती अमूल्य आणि अपरिहार्य असते हे आपल्याला जाणून घेता येईल.
अमेरिकास्थित ज्येष्ठ अभियंते तथा सामाजिक बांधिलकी मानणारे विनोद बापट या वेळी बोलताना म्हणाले की,या पुस्तकात भारताबरोबरच अमेरिका,सिंगापूर,नेदरलँड्स या देशातील व्यक्तींच्या जीवन कथा आणि त्यांचे माध्यमातील कार्य यावरही लिहिले असल्याने ,त्या त्या देशातील जीवन, समाज रचना, भारतीय व्यक्तींचे योगदान वाचकांना कळू शकेल.
रामायणफेम कॅमेरामन अजित नाईक यांनी सांगितले की,आपण आयुष्यभर कॅमेऱ्यामागे राहून काम करीत आलो आहोत. पण या पुस्तकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कॅमेऱ्यापुढे आलो आहोत,असे सांगून त्यांनी सर्व तंत्रज्ञांच्यावतीने लेखकाचे आभार मानले.
दूरदर्शन निर्माती मीना गोखले यांनी देवेंद्र आणि अलका भुजबळ यांनी निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता ते विविध माध्यमांद्वारे समाजात सकारात्मकतेचा संदेश देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविक करताना,पुस्तकाचे लेखक देवेंद्र भुजबळ म्हणाले की,आपल्या आजवरच्या वाटचालीत भेटलेल्या आणि भावलेल्या व्यक्तींविषयी या पुस्तकात लिहिले आहे.खरं म्हणजे या व्यक्तींच्या जीवनावर एकेक पुस्तक होईल,इतके त्यांचे कार्य मोठे आहे. या पुस्तकाची अतिशय देखणी आणि दर्जेदार निर्मिती केल्याबद्दल त्यांनी "ग्रंथाली"चे आभार मानले.
हे आहेत "माध्यमभूषण" !
सर्वश्री पद्मश्री मधु मंगेश कार्णिक,याकूब सईद,प्रो.सुरेश पुरी, प्रदीप दीक्षित, अण्णा बेटावदकर, वासंती वर्तक, प्रकाश बाळ जोशी,डॉ. किरण चित्रे,बी.एन.कुमार, शिवाजी फुलसुंदर,मधु कांबळे ,डॉ. महेश केळुस्कर,अविनाश पाठक,रोनिता टोरकाटो , अजित नाइक,नितिन सोनावणे,प्रणिता देशपांडे (नेदरलँड्स) शोभा जयपुरकर,विनय वैराळे,विनोद गणात्रा, सिद्धार्थ कुलकर्णी,किसान हासे,माधव गोगावले (अमेरिका), प्रो. डॉ. सुचिता पाटील,रत्नाकर तारदाळकर,मेघना साने,राजू झणके, रणजीत चंदेल, शिवानी गोंडाळ,नितिन बिनेकर, स्मिता गव्हाणकर, मर्मबंधा गव्हाणे, नीला बर्वे ( सिंगापूर).सुदेश हिंगलासपुरकर,मीना घोडविंदे, डॉ. सुलोचना गवांदे (अमेरिका).
0 Comments