बसपच्या कार्यक्रमात बहुजन ऐक्याचा निर्धार
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र केंद्रीय प्रभारी व माजी खासदार राजाराम जी, प्रदेशाध्यक्ष ऍड. सुनील डोंगरे तसेच प्रदेश महासचिव व पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड आणि शहर अध्यक्ष देवा उघाडे यांनी केले. कार्यक्रमात राज्य प्रभारी रामचंद्र जाधव, सतीश शिंदे, मुकुंद सोनवणे, प्रदेश सचिव अप्पा लोकरे, संजीव सदाफुले, स्टेट कमिटी मेंबर, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
कांशीराम यांनी बहुजन समाजाला शासन करण्यास सक्षम अशी संघटित शक्ती बनवली. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘राजकीय सत्तेचे स्वराज्य’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणले. त्यांच्या कार्यामुळे बहुजन चळवळ देशभर फोफावली, असे प्रतिपादन यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना राजाराम यांनी केले.
बहन सुश्री मायावती यांनी उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवून बहुजन समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणले. समाजातील वंचित घटकांचा विकास साधणे हेच त्यांच्या राजकारणाचे ध्येय राहिले आहे. हेच ध्येय घेऊन देशातील प्रत्येक राज्यात बसपा कार्यरत असल्याचे राजाराम म्हणाले.
बहन मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांच्या नेतृत्वात बसपा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवेल. समाजाच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम करण्याची गरज आहे,असे आवाहन ऍड.सुनील डोंगरे यांनी केले.
बहुजन चळवळीच्या पुढील दिशा आणि संघटनात्मक बळकटी यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप “बहुजन एकता जिंदाबाद” या घोषणांनी झाला.
कांशीराम यांच्या विचारांनी प्रेरित या कार्यक्रमाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
0 Comments