हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत भटके विमुक्त समाजाचेही योगदान
- पालकमंत्री गोरे
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य निर्माण करत असताना महाराजांनी भटके विमुक्त जातीतील नागरिकांना सामावून घेतले होते. स्वराज्यातील गड-किल्ल्यांचे संरक्षण करणे, हेरगिरी खात्याचे प्रमुख म्हणून बहर्जी नाईक यांची कामगिरी तसेच महाराजांनी या समाजातील अनेक नागरिकांना सन्मानाचे स्थान दिलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत भटक्या विमुक्ताचेही योगदान होते, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, इतर मागास बहुजन विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित भटके विमुक्त दिवसानिमित्तच्या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस शहर उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, राज्य भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष संतोष शिर्के, इतर मागास बहुजन विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांच्यासह भटके विमुक्त समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की सन 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने कायदा करून भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहापासून अलिप्त ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी तत्कालीन शासनाने हा कायदा रद्द केला व भटक्या विमुक्त समाज मुख्य प्रवाहात जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. राज्य शासन ही भटके विमुक्त समाजातील नागरिकांना सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भटके विमुक्त समाजातील बेघर नागरिकांना घरकुलांचा लाभ दिला जात आहे. तसेच या ज्या नागरिकांना स्वतःची जागा नाही, त्यांना जागाही मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. शासन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष श्री. काळे म्हणाले की, भटके विमुक्त समाजाला इंग्रज सरकारने कशा पद्धतीने कायदा करून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. तसेच या समाजावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा ठपका ठेवला, परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी तत्कालीन शासनाने हा कायदा रद्द केला. त्यामुळे या समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा तसेच अन्य समाजासोबत जोडण्याचा लाभ झाला. परंतु आजही हा समाज शासनाच्या अनेक योजना पासून वंचित आहे. या समाजातील अनेक नागरिक जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड यापासून वंचित आहेत. तरी या समाजाच्या नागरिकांना सर्व शासकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाने वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करून त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावीत, असे त्यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन विभागाचे सहाय्यक संचालक श्री सोनटक्के यांनी आपल्या प्रस्ताविकास सांगितले की, शासन भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना चा लाभ देत आहे. राज्य शासनाने 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केलेला असून या अनुषंगाने या समाजातील नागरिकांमध्ये शासकीय योजना बाबत प्रबोधन केले जाणार आहे.
प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे व मान्यवर यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा चे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून भटके मुक्त दिवस ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते भटके मुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थी, राज्य शासनाच्या सेवेत नुकतेच निवड झालेले उमेदवार यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात भटके मुक्त समाजातील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड आदींचे वाटपही करण्यात आले. प्रारंभी नियोजन भवन परिसरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भटके विमुक्त समाजातील नागरिकांनी पारंपारिक वाद्य वाजवून व नृत्य चे सादरीकरण करून स्वागत केले.या कार्यक्रमास भटके विमुक्त समाजातील शेकडो विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
मागील वर्षभरात भटके विमुक्त साठी प्रशासनाने केलेले कार्य-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 25 शिबिरांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील नागरिकांना 1609 मतदान ओळखपत्रे, 1421 जात प्रमाणपत्रे, 517 आधार कार्ड, 19 दिव्यांग प्रमाणपत्रे, तसेच 914 आयुष्यमान भारत कार्ड वितरित केली. विशेष म्हणजे, 62 लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत जमीन वाटप करण्यात आली, ज्यामुळे या समाजघटकांना स्थैर्य व सन्मान प्राप्त झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे व भटके विमुक्त विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री. काळे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
0 Comments