सोलापूर (कटूसत्य वृत्त) :-
सोलापूर शहरातील हरित क्षेत्र वाढीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सोलापूर महापालिका व नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) यांच्यात वृक्षारोपण व देखभाल प्रकल्पासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या *माझी वसुंधरा अभियानांतर्गत* राबविण्यात येणार आहे.
करारानुसार २०२५-२६ व २०२६-२७ या दोन वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर सलग दोन वर्षे झाडांची जोपासना व देखभाल केली जाणार आहे. स्थानिक हवामानाला अनुरूप जाती, फळझाडे तसेच जलद वाढणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे निरीक्षण जीआयएस व ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे होणार असून झाडांची किमान ९० टक्के जोपासना सुनिश्चित करण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे.
या करारामुळे शहरात हरित क्षेत्र वाढून स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पर्यावरण घडण्यास हातभार लागणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बुधवारी महापालिकेत झालेल्या करार कार्यक्रमाला आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे, एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक एम. के. बेबी, सहाय्यक महाव्यवस्थापक रफिकुल इस्लाम, उपायुक्त तैमूर मुलाणी, उपमहाव्यवस्थापक अमित कुमार सिंह, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक स्वप्निल सोलंकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments