सोलापूरात पूरस्थितीचा फटका – शेकडो शाळा धोक्यात
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :-
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे तब्बल ३४५ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बाधित झाल्या आहेत. ही माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार गटशिक्षण अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुका पातळीवरून माहिती संकलनाचे काम सुरू असून, बाधित शाळांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही शेख यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ज्या ठिकाणी वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत आहेत, तेथे विद्यार्थ्यांना न बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने पर्यायी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.
पूराचा धोका असलेल्या शाळांमधील महत्त्वाचे प्रशासकीय कागदपत्रे, धान्य व साहित्य तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून मिळणाऱ्या सर्व सूचना समाजमाध्यमांद्वारे अधिकारी, कर्मचारी व पालकांपर्यंत त्वरित पोहोचविण्याबाबतही गटशिक्षण अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
0 Comments