पुराच्या पाण्यात वाहून गेली महायुती सरकारची संवेदना
ओल्या दुष्काळाने शेतकरी कोलमडला, मंत्र्याचा मात्र पर्यटन दौरा?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खरे तर सप्टेंबर-ऑक्टोबर हे खरीप सुगीचे अन् सणवारांचे महिने आहेत. खरिपातील पिके हाती आलेली असतात. त्यातून सणवारांचा आनंद द्विगुणित होतो. परंतु या वर्षी शेतशिवारात पावसाने थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
या वर्षीची ही काही पहिलीच आपत्ती नाही. जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर या तिन्ही पावसाळी महिन्यांत अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.
अनेक ठिकाणी काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात आहे. कापसाची बोंडे शेतात साठलेल्या पाण्यात सडत आहेत. नदी-नाले परिसरात पिकांबरोबर शेतातील माती, पशू-पक्षी याबरोबर ट्रॅक्टर, कडबा कुट्टी, सोलर पंप, खते-धान्यांची पोते, सूक्ष्म सिंचन संच आदी साहित्य वाहून गेले आहे. काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकड्यांत अंदाज बांधणे कठीण आहे.
राज्यभरात अतिवृष्टी झाली असली, तरी मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर या भागांना तडाखा अधिक बसला आहे. राज्यात खरिपाचे क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे १३५ लाख हेक्टरवर पेरा होतो. त्यातील २६ लाख हेक्टर (२० टक्के) क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांबरोबर राज्याचीही ही मोठी हानी आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी मदत निधीची घोषणा केली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सप्टेंबरअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मदतीची ग्वाही दिली आहे. परंतु या सर्व घोषणा औपचारिक असतात. नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना आलेला अनुभव वेगळाच आहे.
नुकसानग्रस्त भागांचे नीट पाहणी-पंचनामे होत नाहीत. शासनाची मदत अनेकांपर्यंत पोहोचत नाही. ज्यांना मदत मिळाली तिही तुटपुंजी असते. या वर्षी पीकविम्याला थोडा कमीच प्रतिसाद मिळाला. त्यातही नुकसानीचे महत्त्वाचे ट्रिगर्स कमी केल्यामुळे विमा भरपाई मिळण्याच्या आशाही कमी झाल्या आहेत. शासकीय मदत जुन्या निकषांप्रमाणे मिळणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळणार नाही.
या वर्षीच्या संकटाकडे शासन-प्रशासनाला नेहमीचे संकट म्हणून पाहू नये. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नोकरदाराला महिन्याचा पगार दिला नाही तर घर कसे चालणार म्हणून ओरड सुरू होते. येथे तर मागील तीन-चार वर्षांपासून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सातत्याच्या नैसर्गिक आपत्तींनी पूर्ण पीक वाया जात असताना त्यांनी घरसंसाराचा गाडा कसा चालवायचा, हा खरा प्रश्न आहे.
राज्यात अतिवृष्टीच्या निकषांत बदल करा, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्या शेतकरी करीत आहेत. सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून कमी पावसाला अवर्षण, तर १० टक्क्यांहून अधिक पावसाला अतिवृष्टी म्हणून संबोधले जाते. यानुसार अतिवृष्टीजन्य परिस्थिती राज्याच्या अनेक भागांत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन जुन्या-नव्या निकषांनुसार नाही तर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई अथवा मदत मिळायला हवी.
एवढेच नाहीतर शेतकऱ्यांची कर्जमाफी, शैक्षणिक फी माफी आदी सवलती त्यांना मिळायला हव्यात. असे झाले तरच या आपत्तीत तो तग धरणार आहे. बदलत्या हवामान काळात सातत्याच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. अशा वेळी ओल्या दुष्काळावर नव्याने विचार करावा लागणार आहे. भरपाईचे निकषही नव्याने ठरवावे लागतील. असे झाले तरच अतिवृष्टी अथवा ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
ओल्या दुष्काळाने शेतकरी कोलमडला, मंत्र्याचा मात्र पर्यटन दौरा?
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पाण्यात गेले. घरं कोसळली आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून मागणी करण्यात येत आहे.
त्यातच मुख्यमंत्री, उपमु्ख्यमंत्र्यांसह मंत्रांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी दौरे सुरू केले आहेत.
मंत्र्याचे नुकसान पाहणी दौरा आहे की पर्यटन? असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा बुधवार (ता.24) सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी 1 तास आणि पक्ष संघटनेसाठी 6 तास राखीव आहेत. म्हणजे शिरसाठसाहेब पक्ष संघटनेच्या बैठकीतून केवळ पाय मोकळा करण्यासाठी येणार आहेत का? ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय आहे? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
'हे मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार आहेत की त्याच्या जखमेवर मीठ चोळणार आहेत? अशा 'पर्यटन' मंत्र्यांच्या दौऱ्यांची शेतकऱ्यांना कदापि गरज नाही. अशा फालतू दौऱ्यापेक्षा सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस अतिवृष्टी, तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा करमाळा मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या अनेक गावांमधील नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत.
एवढेच नव्हे, तर या पुराच्या पाण्याचे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ५६ गावे अंधारात असून, ३८०० वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. उपकेंद्र अन् ट्रान्सफाॅर्मर पाण्यात असल्याची विदारक स्थिती दिसून येत आहे.
दरम्यान, सातत्याने महापुराचे पाणी गावात शिरत असल्याने गावाशेजारील ट्रान्सफाॅर्मर पाण्यात आहेत. पुढील धोका ओळखून उपकेंद्रातून त्या ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, करमाळा, मोहोळचे कार्यकारी अभियंता गावागावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शिवाय वीजयंत्रणेपासून दूर राहण्याच्या सूचनाही महावितरणकडून वेळोवेळी बाधित गावातील लोकांना देण्यात येत आहेत.
0 Comments