Hot Posts

6/recent/ticker-posts

पूरग्रस्त शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली

 पूरग्रस्त शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली




माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

या दौऱ्यादरम्यान माढ्यात एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून आपला संताप व्यक्त केला.

परिसरात तणावाचे वातावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ या पूरग्रस्त गावांची पाहणी करून परत जात असताना ही घटना घडली. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे या भागात शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपली व्यथा आणि नुकसान झालेले पाहून निराश झालेल्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अचानक त्यांची गाडी अडवली. हा शेतकरी धावत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गेला. यानंतर त्याने हातवारे करत मुख्यमंत्र्‍यांपुढे व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेले सुरक्षारक्षक त्याला बाजूला केले आणि नंतर मुख्यमंत्र्‍यांची गाडी पुढे गेली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्री पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी शेतकऱ्याने व्यक्त केलेल्या भावना समजून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला धीर दिला. शासन या सर्व बाधित लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, तातडीची मदत दिली जाईल. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

दरम्यान बीड जिल्ह्यातील सिंदफना नदीला आलेल्या पुरामुळे नाथापूर गावातील शेकडो हेक्टर ऊस, सोयाबीन आणि कापसाचे पीकही पाण्याखाली गेले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. माढ्यात घडलेली घटना ही या संतापामुळेच घडली असावी, असे बोललं जात आहे. आता सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments