अक्कलकोटला मुसळधार पावसाची बॅटिंग'; चार ठिकाणचे रस्ते बंद
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- तालुक्यात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान पडलेल्या पावसामुळे तसेच धाराशिव जिल्ह्यातील पावसामुळे बोरी नदीत पाणी वाढले. अक्कलकोट तालुक्यात पुन्हा पुरस्थिती निर्माण झाली असून चार ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
तसेच हन्नूर भागातील पितापूर गावाच्या पुलावरून पाणी वाहत आहे. कुरनूर धरणातून पुन्हा २२०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून बोरी नदीकाठच्या नागरिक व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अक्कलकोट शहरात काल सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत सुमारे दीड तास मुसळधार पाऊस पडत होता. तसेच शहर व तालुक्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतात पाणी साठले आहे. पंधरा दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. नदी, नाले, ओढे, तलाव भरल्याने आता पडत असलेल्या पावसाचे पाणी थेट नदीला व तलावाला जाऊन मिळत असल्याने नदीचा व तलावांचा जलस्तर वाढत आहे. त्यामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती निर्माण होत आहे.
सोमवारी पहाटे शावळ गावाजवळील ओढ्यावर पाणी आल्याने शावळ ते घुंगरेगाव रस्ता बंद झाला. तसेच वागदरी भागातील शिरशी येथील पुलावरून पुन्हा पाणी जात असल्याने अक्कलकोट ते वागदरी रस्ता पुन्हा बंद झाला. जेऊर येथील गावाजवळ पाणी आल्याने जेऊर ते जेऊरवाडी रस्ता बंद झाला. तसेच बोरी नदीत पाणी वाढल्याने हनुमान भागातील पितापूर या गावातील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच दर्शनाळ येथे हरणा नदीला पूर आल्यामुळे दर्शनाळ-आरळी-मुस्ती या गावाशी संपर्क तुटला आहे. भीमा नदीतसुद्धा उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अक्कलकोट तालुक्यातील वाहणाऱ्या भीमा नदी पात्राच्या बाजूकडील गावात व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
दक्ष राहा; शेतकऱ्यांना सूचना
सीना नदी पात्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागातील कोर्सेगाव, कलकर्जाळ या गावासह सीना नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या कोरसेगाव बंधाऱ्यावर दोन फूट पाणी असून वाढलेल्या पाण्यामुळे बंधाऱ्यावर आणखी पाणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments